आबूधाबी जाणार्या बांगलादेशी नागरिकाला अटक
22 वर्षापूर्वी भारतात आला आणि 9 वर्षांपूर्वी पासपोर्ट काढले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – आबूधाबीला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या भजनकुमार निलकमल सरकार या 41 वर्षीय बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. बावीस वर्षांपूर्वी भारतात आलेला भजनकुमारने नऊ वर्षांपूर्वी कोलकाता पासपोर्ट कार्यालयात बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच पासपोर्टवर त्याने अनेकदा बांगलादेशासह विविध देशात प्रवास केल्याचे नोंद दिसून आली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता भजनकुमार हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला आबूधाबीला जायचे होते, त्याच्या भारतीय पासपोर्टसह इतर दस्तावेजाची पाहणी केल्यानंतर तो तीन वेळा बांगलादेशात गेल्याची पासपोर्टमध्ये नोंद होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याच्याकडे बांगलादेशात जाण्यामागील कारण विचारण्यात आले होते, मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील गरीबी आणि उपासमारीला कंटाळून तो 2003 साली भारतात स्थंलातरीत झाला होता. त्यानंतर तो कोलकाता येथील दिनाजपूरमध्ये राहत होता.
तिथे वास्तव्यास असताना तने 2016 साली कोलकाता पासपोर्ट कार्यालयात बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविले होते. 2017 साली तो ओमानला गेला होता. तिथे तीन वर्ष नोकरी करुन तो सौदी अरेबिया येथे गेला होता. मे 2025 रोजी तो सौदीहून मुंबईत आला होता. त्यानंतर तो त्याच्या कोलकाता येथील घरी वास्तव्यास होता. काही दिवसांनी तो पुन्हा बांगलादेशात गेला होता. 2 जुलैला तो पुन्हा भारतात आला होता.
शुक्रवारी 4 जुलैला तो नोकरीसाठी आबूधाबी येथे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मात्र इमिग्रेशन अधिकारी मनोजकुमार चिन्नूप्रसाद यांच्या सतर्कमुळे त्याचा आबूधाबीला जाण्याचा प्रयत्न फसला गेला. त्यांच्याच तक्रारीवरुन सहार पोलिसांनी भजनकुमारविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविणे, याच पासपोर्टवर विविध देशात प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला भारतीय पासपोर्ट मिळविण्यात कोणी मदत केली याचा आता पोलीस तपास करत आहेत.