पेट्रोलपंपाच्या 1.20 कोटीचा अपहार करुन शेअरमध्ये गुंतवणुक

आरोपी सेंकड मॅनेजरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – जोगेश्वरीतील एका पेट्रोलपंपाची पेट्रोल-डिझेल विक्रीतून जमा झालेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांचा मॅनेजरनेच अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेट्रोलपपांच्या मॅनेजरविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिंद्र रुपशंकर जोशी असे या 43 वर्षीय मॅनेजर आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानच्या उदयपूरचा रहिवाशी आहे. गेल्या सहा वर्षांत त्याने आर्थिक गैरव्यवहार करुन ही रक्कम शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

भावेश नेमजी मारु हे वसईचे रहिवाशी असून जोगेश्वरीतील आदर्शनगर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे सुपरवायजिंग मॅनेजर म्हणून कामाला आहेत. या पेट्रोलपंपाचे मालक कुणाल महिंद्रा छेडा हे असून त्यांच्यावरच मालकांनी संपूर्ण आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपविली होती. तिथे 2019 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत महिंद्र जोशी हा सेंकड मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याच्यावर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीची कॅश स्वरुपात जमा होणारी रक्कम, पेट्रोलपंपाच्या नावाने आलेले धनादेश दुसर्‍या दिवशी बँकेत जमा करणे, इंडियन ऑईन कंपनीला पेमेंट करणे, इतर कर्मचार्‍यांकडून काम घेणे आदी कामाची जबाबदारी होती.

जानेवारी 2025 रोजी कुणाल छेडा यांनी पेट्रोलपंपाचे अकाऊंटची तपासणीसाठी कविन मनोज गडा याची नियुक्ती केली होती. ही जबाबदारी हाती येताच त्याने एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील अकाऊंटची तपासणी सुरु केली होती. त्यात त्यांना महिंद्र जोशी यांच्या बँक खात्यात कंपनीच्या बँक खात्यातून काही व्यवहार झाल्याचे दिसून आले. तसेच त्याने पेट्रोलपंपाची जमा झालेली रक्कम आणि बँकेत जमा केलेल्या रक्कमेत तफावत असल्याचे दिसून आले होते. ही तफावत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची होती. हा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी ती माहिती मालक कुणाल छेडा यांना दिली होती. यावेळी त्याने महिंद्र जोशी याने कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करुन या रक्कमेचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुणाल छेडा यांनी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासणीचे आदेश दिले होते. त्यात महिंद्रने 83 लाख 70 हजार रुपये त्याच्या मित्राच्या बँक खात्यात तर पेट्रोल-डिझेल विक्रीतून जमा झालेल्या 36 लाख 34 हजार 818 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते.

हा प्रकार उघडकीस येताच कुणाल छेडा यांनी महिंद्र जोशीकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने कंपनीच्या 1 कोटी 20 लाखांचा अपहार केल्याची कबुली देताना ही रक्कम त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याच्या गावची प्रॉपटी विकून संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे तीन महिन्यांची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे कुणाल छेडा यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र दिलेल्या मुदतीत महिंद्रने फसवणुकीची रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. त्यामुळे कंपनीच्या वतीने कुणाल छेडा यांनी भावेश मारु यांना ओशिवरा पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर भावेश मारु याने महिंद्र जोशीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून महिंद्रची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page