घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सतरा वर्षांच्या मुलाची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पिडीत मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहत असून दोघेही सध्या शिक्षण घेत आहे. एकाच चाळीत राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास पिडीत मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावेळी तिथे आरोपी मुलगा आला. घरात कोणीही नसल्याचे लक्षात येताच त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हाताने तिचे तोंड दाबून त्याने तिचे कपडे काढून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
काही वेळानंतर तो तिच्या घरातून निघून गेला. घडलेला प्रकार मुलीकडून तिच्या पालकांना समजताच त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना पिडीत मुलीने घडलेला प्रकार सांगून आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी सांताक्रुज येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने पिडीत मुलीच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.