अरुण सावरटकर
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. खरंच देणाऱ्याचे हात म्हणजे देण्याची दानत आज या दुनियेत प्रत्येकाने घेतली तर हे जग सुंदर आणि भूकहिन होईल नाही का, जो देत असतो त्याला चिंता नसते आपले काही होईल पण भूकेल्याच्या पोटात दोन घास पडतील याचे सुख असते. अशीच एक व्यक्ती वर्सोव्यात आहे. तिला अजय कौल या नावाने ओळखले जाते. अनेकांचे ते सर आहेत. त्यामुळे अजय सर असेही त्यांना म्हणतात. त्यांचा जन्म शांतीदूत म्हणूनच झाला की काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण देण्याची ताकद काय असते हे या अजय कौल यांच्याकडे पाहिले तर दिसून येते. हे अजय कौल वर्सोव्यात चिल्ड्रन वेलफेअर सेंटर चालवतात. जेव्हा पासून या वेलफेअर सेंटरची स्थापना झाली आहे, तेव्हापासून ती शाळा नव्हेतर अडलेल्या, नाडलेल्या लोकांचे आश्रयस्थान झाले आहे. या संस्थेमध्ये जो कोणी येतो तो विन्मुख होऊन जात नाही. पण भूकेलेल्याच्या पोटात दोन घास जातात, नाडलेल्या व्यक्तीला त्याच्या अडचणीवर मात करता येते आणि गांजलेल्यांना सहारा मिळतो.दुपारच्यावेळी या शाळेत तुम्ही कधी गेलात तर किमान शंभर एकजणांना जेवण मिळते. अनेक भूकेल्या व्यक्ती तेथे तुम्हाला दिसतील. तितक्या व्यक्ती रात्रीच्यावेळी जेवणासाठी येथे येतात. केवळ दानधर्म इतकेच अजय सरांचे कर्तृत्व नाही. तर अजय सर समाजाला एकत्रित ठेऊन बंधूभाव वाढवण्यास अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या शाळेत वर्सोवातील प्रतिष्ठीत व्यक्ती जसे, डाॅक्टर, वकील, व्यावसायिक नियमित येत असतात. अशा प्रतिष्ठीत व्यक्तींना एकत्र करून त्यांच्यामार्फत समाजकारण करण्याचे मोठे व्रत अजय सरांनी हाती घेतले आहे.
अजय सरांचा प्रवास मोठा रंजक आहे. अजय कौल यांना आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव त्यांच्या तरुणपणापासूनच होत होती. स्वभाव देण्याचा असल्यामुळे आपण काहीतर समाजासाठी करावे, असे त्यांना सातत्याने वाटत होते. ती अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी निर्णय घेतला. तो निर्णय अर्थातच शिवधनुष्य उचलण्याचा होता. अजय कौल यांनी वर्सोवा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या पालकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी इमारत हवी, शिक्षक हवेत. मुख्य म्हणजे शाळेत येणारी मुले हवीत. पण अजय सर ठाम होते. एखादी व्यक्ती निर्णयावर ठाम असेल तर त्यातून मार्ग निघतो. ठरले होते की शाळा सुरू करायची. १९८१ साली वर्सोवा कोळीवाड्यातील एका खोलीत त्यांनी सात मुलांना सोबत घेऊन शाळा सुरू केली. सात विद्यार्थी आणि अजय सर इतकीच शाळा. पण इच्छाशक्ती इतकी दांडगी होती की, त्या लावलेल्या रोपाचे आता वटवृक्ष झाला आहे. आज चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल मध्ये सुमारे हजारो विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असा मोठा स्टाफ शाळेत आहे. पण केवळ शाळा काढून थांबतील तर ते अजय सर कुठले. त्यांनी महाविद्यालयही सुरू केले. कलाराज काॅलेज आॅफ काॅमर्स असे या महाविद्यालयाचे नाव आहे. येथे बी.काॅम पर्यंत शिक्षण मिळते. या संस्थेत सुमारे तीन हजारांहून अनेक विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे अजय कौल यांच्या शिक्षणातील या देदीप्यमान कामगिरीची दखल राज्य शासनानेही घेतली. २००३ मध्ये अजय कौल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
समाजकार्यासाठी शाळा काढणे हे उद्दीष्ट असल्यामुळे अजय सर समाजकार्याशीही जुळून राहिले. वर्सोव्यातील स्थानिक समस्या सोडवणे, नागरिकांना दिलासा देणे, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना एकत्र आणून त्यातून समाजासाठी काम करत राहणे, हे अजय सर सातत्याने करत होते. समाजात शांतता राहण्यासाठी जातीय सलोखा असणे गरजेचे असते, हे अजय सरांना ताडले होते. त्यामुळेच १९९२-९३ साली जेव्हा मुंबई दंगलीत होरपळली असताना अजय सर शांत बसले नव्हते. तेव्हा त्यांनी जातीय सलोखा प्रस्थापित करण्याच्या कामात आपल्याला गुंतवून टाकले. वर्सोवा-यारी रोड येथे दंगलीची फार कमी झळ पोहचली, त्याला कारण अजय कौल सर हे होते. त्यांनी मोहल्ल्यात जाऊन बैठका घेतल्या. लोकांना समजावले. पोलिसांसोबत काम केले. त्यामुळे वर्सोवा-यारी रोड येथे दंगलीची झळ पोहच नाही. कौल सर यांच्या या महान कामगिरीमुळेच त्यांना पश्चिम उपनगरात शांतीदूत म्हणून ओळखले जाऊ लागेल. ही शांतता प्रस्थापित करताना कौल यांनी मोहल्ल समित्यांचा आधार घेतला. त्यामार्फत अजय सरांनी शांतता आणि जातीय सलोखा निर्माण केला. अजय सरांनी मोहल्ला समित्यांच्या मार्फत विभागात दिवाळी, ईद, नाताळ हे सण सामुहिकरित्या साजरे करण्यास सुरुवात केली. तसेच चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, मेळावे, क्रिकेट यांचे आयोजन करून जातीय सलोखा राहिल. दंगली होणार नाहीत, हे पाहिले.
चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटरही शाळा वर्सोवातील एक आदर्शशाळा मानली जाते. या शाळेने वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे वर्सोवा विभागातील पालक आणि विद्यार्थांसाठी ही शाळा म्हणजे एक आकर्षण झाले आहे. या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आलेला आहे. या शाळेत केवळ शिक्षणच नाही तर विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासठी विविध उपक्रम राबवले जात आहे. अर्थात त्याचे प्रणेते हे प्रिन्सिपाॅल अजय कौल सर आहे हे काही वेगळे सांगायला नको. करोनाचा काळ तर कोणीच विसरू शकत नाही. पण त्या काळात अजय सर यांनी एकता मंचच्या माध्यमातून केलेले काम आज वर्सोव्यात कोणी विसरलेले नाही. आमची सेवा या बोधवाक्याखाली करोनाच्या काळात काम करण्यात आले. तेव्हा अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. घरात खायला अन्न नव्हते. तेव्हा अजय सरांच्या माध्यमातून धान्याची ५००० पाकीटे वाटण्यात आली. ही पाकिटे वर्सोवा, अंधेरी, मढ, गोरेगाव, वांद्रे, लोणावळा, महाबळेश्वर येथे वाटण्यात आहे. तसेच शिजवलेल्या अन्नाच्या ६० हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले. स्थानिक डाॅक्टरांना ५०० पीपीई किट वाटण्यात आले. त्याकाळात रक्तदान शिबिरे घेऊन रक्तांच्या अनेक बाटल्या गरजूंसाठी इस्पितळांना देण्यात आल्या. २००० लोकांची करोना तपासणी करण्यात आली. मास्क, ग्लोजचे वाटप अशी अनेक कामे या काळात झाली. ती आठवून आजही स्थानिक लोक अजय कौल यांची प्रशंसा करतात. म्हणून मी लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलं देणारे देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण कधीतरी घेणाऱ्याने अजय कौल सरांचे हातही घ्यावेत.