मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, – बेस्ट बसच्या धडकेने दुखीलाल वुडून सरोज या 60 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी अपघाताची नोंद करुन अपघाताला जबाबदार असलेला बसचालक नागेश संभाजी राणे याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता अॅण्टॉप हिल येथील शेख मिस्त्री दर्गा रोडवरील सीजीएस सेक्टर सात, महालक्ष्मी स्टिल शॉपसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विराज तानाजी साठे हे मानखुर्द परिसरात राहत असून सध्या अॅण्टॉप हिल पोली ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी दिवसपाळीवर कर्तव्यावर असताना सायंकाळी महालक्ष्मी स्टिल शॉपसमोर अपघात झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेल्यानतर पोलिसांना एका बेस्ट बसने केळीची हातगाडी घेऊन जाणार्या वयोवृद्धाला धडक दिल्याचे दिसून आले. त्यामुळे जखमी वयोवृद्धाला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता.
तपासात मृत वयोवृद्धाचे नाव दुखीलाल सरोज असल्याचे उघडकीस आले. ते अॅण्टॉप हिल येथील सीजीएस कॉलनी, सेक्टर क्रमांक सातमध्ये राहत होते. केळी घेऊन हातगाडीवरुन जाताना त्यांना बेस्ट बसने धडक दिली होती. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलिसांनी बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी बसचालक नागेश राणे याला पोलिसांनी अटक केली.