कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करणार्या आरोपीस अटक
दिड लाखाच्या कर्जासाठी कागदपत्रे देणे महागात पडले
राजू परुळेकर
१७ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन एका खाजगी कंपनीकडून कर्ज घेऊन एका २९ वर्षांच्या तरुणाची फसवणुक केल्याप्रकरणी सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अखेर चारकोप पोलिसांनी अटक केली. जयेश एकनाथ पवार असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जयेशवर तक्रारदाराच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन तीन अर्थपुरवठा करणार्या कंपनीकडून सुमारे पावणेअकरा लाखांचे कर्ज घेऊन फसवणुक केल्याचा आरोप आहे. दिड लाखांच्या पर्सनल लोनसाठी जयेशला कागदपत्रे देणे या तरुणाला चांगलेच महागात पडले होते.
२९ वर्षांचा तक्रारदार पूर्वेश किरण गोरेगावकर हा कांदिवली परिसरात राहत असून ओबेरॉय हॉटेलमध्ये कामाला आहे तर त्याची पत्नी श्वेता ही दाताची डॉक्टर आहे. तिचे चिकूवाडी येथे स्वतचा क्लिनिक आहे. तिच्या क्लिनिकमध्ये जयेश त्याच्या आई-वडिलांसोबत येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. त्याने त्यांना तो व्ही. केअर मोबीलिटी कंपनीचा मालक असून ही कंपनी अनेकांना कमी व्याजदरात कर्ज मिळवून देते असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी पूर्वेशला दिड लाखांचे पर्सनल लोनची गरज होती. त्यामुळे त्याने जयेशकडे विचारणा केली होती. त्याने त्याला कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून त्याचे कागदपत्रे घेतले होते.
सप्टेंबर महिन्यांत त्यांच्या बँक खात्यात तीन वेगवेगळ्या अर्थपुरवठा करणार्या कंपनीतून सुमारे पावणेअकरा लाख रुपये जमा झाले होते. याबाबत त्यांनी जयेशकडे विचारणा केली असता त्याने त्याच्या कर्मचार्याच्या चुकीमुळे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने कर्जाची गरज नसल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम ट्रान्स्फर केली होती. कर्जाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळे काही महिने कर्जाचे हप्ते त्याच्या बँक खात्यातून कापले जातील आणि नंतर संपूर्ण पेमेंट करुन त्याला कर्जांची परतफेड केल्याची एनओसी दिली जाईल असे जयेशने पूर्वेशला सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
मार्च २०२३ पर्यंत त्याच्या बँक खात्यातून कर्जाची सुमारे ३४ हजार रुपये डेबीट झाले होते. नंतर त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. एनओसीसंदर्भात त्याने जयेशला फोन केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. याच दरम्यान त्याला संबंधित कंपन्यांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी कॉल येत होते. त्यामुळे त्याने घडलेला संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगून यापुढे तो कर्जाचे हप्ते भरणार नाही. कर्जाची ही रक्कम जयेशच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली आहे. त्यामुळे या कर्जाशी त्याचा काहीही संबंध नाही असे सांगितले. तरीही त्याला संबंधित कंपनीकडून मानसिक त्रास दिला जात होता. जयेशने दिड लाखांच्या पर्सनल लोनसाठी घेतलेल्या त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन तीन वेगवेगळ्या कंपनीकडून कर्ज घेऊन त्याची फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर त्यांनी जयेशविरुद्ध चारकोप पोलिसंात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच जयेश हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या जयेश कदमला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, कर्जाच्या रक्कमेची त्याने कुठे आणि कशी विल्हेवाट लावली याचा आता पोलीस तपास करत आहेत.