युरोप-दुबई टूरसाठी काम देण्याच्या आमिषाने दहाजणांना गंडा

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या टूर आयोजकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – युरोप-दुबईसाठी टूर मॅनेजर म्हणून काम देण्याची बतावणी करुन दहा टूर मॅनेजरकडून विमानासह इतर कामासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी विरल आश्विन ठक्कर या टूर आयोजकाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

केवल अतुल गाला हे मालाडच्या राणी सती मार्ग, देवडा अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खाजगी टूर कंपनीत फ्रिलान्सर टूर मॅनेजर म्हणून कामाला आहेत. त्यांच्यासोबत इतर नऊ तरुण टूर मॅनेजर म्हणून कामाला असून ते सर्वजण एकमेकांशी चांगले परिचित आहेत. एप्रिल 2025 रोजी त्यांचा सहकारी टूर मॅनेजर विराज भटाडा याने त्याच्याकडे युरोप टूरचे काम आल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे युरोप टूरबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी विरल ठक्करशी चर्चा करुन त्याच्याकडे विचारणा केली होती. यावेळी विरल ठक्करने त्यांना त्याला त्याच्यासह दहा सहकार्‍यांची टूर मॅनेजर म्हणून काम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे इतर टूर मॅनेजरसह विमान तिकिटासाठी विरल ठक्कर याने टप्याटप्याने 7 लाख 28 हजार रुपये घेतले होते.

7 मेला व्हिसासाठी त्यांच्यासह इतर दहा टूर मॅनेजरला बीकेसी येथील व्हिसा कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मात्र तिथे विरल आला नाही. त्याने व्हिसासाठी प्रत्येक टूर मॅनेजरच्या बँक खात्यात आठ लाख रुपये जमा करणे आवश्यक आहे. व्हिसा देताना आता नवीन नवीन नियम लागू झाले असून ही रक्कम जमा झाल्याशिवाय त्यांना युरोप व्हिसा मिळणार नाही असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी युरोप टूर कॅन्सल करुन त्याच्याकडे कामासाठी दिलेल्या दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.

विरल ठक्करकडून आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच केवल गाला यांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विरलविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच विरल हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना दिड महिन्यानंतर पळून गेलेल्या विरल ठक्करला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने तक्रारदारासह इतर दहा टूर मॅनेजरला युरोप आणि दुबईसाठी टूर मॅनेजर म्हणून काम देतो असे सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page