व्यवसाय वाढीसाठी बँकेतून क्रेडिट फॅसिलिटी घेऊन फसवणुक
साडेसहा कोटीच्या फसवणुकप्रकरणी व्यावसायिकाला अटक
राजू परुळेकर
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – व्यवसाय वाढीसाठी बँकेतून क्रेडिट फॅसिलिटी कर्ज घेऊन दोन बंधूंची सुमारे साडेसहा कोटीची फसवणुक केल्याच्या कटातील मुख्य व्यावसायिक आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. मोहम्मद उमर फारुख बसर असे या व्यावसायिकाचे नाव असून तो भिवंडीतील बोरिवली पडगा, ऍडिलेड इस्टेचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मोहम्मद उमरची आई रशिदा फारुख बसर ही सहआरोपी असून तिच्याविरुद्ध पोलिसांनी किल्ला कोर्टात आरोपपत्र सादर केले आहेत.
तारीक हबीब रेहमान अन्सारी हे टेनिस कोच असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबई सेंट्रल परिसरात राहतात. त्यांचा भाऊ सरोश अन्सारी हा २००९ साली मोहम्मद उमर बसर याच्या खाजगी कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून कामाला होता. मोहम्मद उमरचा स्टिल निर्यातीचा व्यवसाय होता. त्याला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी पैशांची गरज होती. याच दरम्यान मोहम्मद उमर आणि त्याची आई राशिदा बसर यांनी सरोश व त्यांचा तक्रारदार भाऊ तारीक अन्सारी यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयतन केला आहे. त्यांच्या व्यवसायात प्रचंड फायदा आहे. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांना बँकेकडून क्रेडिट फॅसिलिटी मिळत आहे, मात्र त्यासाठी अचल मालमत्ता तारण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करावी. त्यामोबदल्यात त्याने त्यांना व्यवसायात चांगला परतावा देण्याचे तसेच त्यांचा भाऊ सरोश याला कंपनीत संचालकपदी नेमून त्याला राहण्यासाठी फ्लॅट आणि कार देण्याचे आश्वासन दिले होते.
काही दिवसांत त्यांच्याच कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुंबई सेंट्रल येथील दूधवाला कॉम्प्लेक्समधील दोन फ्लॅट बँकेत तारण ठेवून पाच कोटीची क्रेडिट फॅसिलिटी कर्ज घेतले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या बसर स्टेनलेस स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुक केली होती. त्यानंतर मोहम्मद उमरने त्यांचा भाऊ सरोश याला कंपनीत संचालक बनविले होते. त्याला एक वर्षांसाठी राहण्यासाठी एक फ्लॅट आणि कार दिली होती. मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी व्यवसायात झालेला फायद्याची रक्कम त्यांना दिली नाही. विचारणा केल्यानंतर त्यांनी भावाला दिलेला फ्लॅटसह कार काढून घेतली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच सरोशने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी बँकेत तारण ठेवलेले दोन्ही फ्लॅट मुक्त करुन उमर बसर याच्याकडून दुसरी मालमत्ता तारण घेण्याचे लेखीपत्र दिले होते. मात्र त्यांनी कुठलीही दुसरी मालमत्ता तारण ठेवली नाही. बँकेकडून सतत विचारणा होत असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीसह शहापूर येथील फार्म हाऊस आदी मालमत्ता तारण ठेवून पाचऐवजी पंधरा कोटीचे क्रेडिट फॅसिलिटी घेतले होते.
मात्र बँकेचे कर्ज न फेडता तसेच अन्सारी बंधूंच्या फ्लॅटवर कर्जाचा बोजा करुन त्यांची साडेसहा कोटीची फसवणुक केलीद होती. याच दरम्यान तारीक आणि सरोश यांना मोहम्मद उमरला व्यवसायासाठी दिलेले पाच कोटी त्याने मौजमजा तसेच कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतविल्याचे समजले होते. व्यवसाय वाढीसाठी गुंतवणुकीच्या आमिषाने या दोघांनी अन्सारी बंधूची फसवणुक केली होती. सरोश यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या वतीने तारीक अन्सारी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत मोहम्मद उमर आणि राशिदा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४२०, १२० बी, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मोहम्मद उमर बसरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.