फ्लॅटसाठी घेतलेल्या अडीच कोटीचा अपहार करुन फसवणुक
व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – कांदिवलीतील एसआरए इमारतीच्या पुर्नविकास प्रोजेक्टमध्ये सात फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे अडीच कोटीचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीजी कन्स्ट्रक्शनचे मालक असलेल्या दोन संचालकासह रियल इस्टेट एजंट अशा तिघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. किर्ती मनोहरलाल मेहता, मोना किरण मेहता आणि सुनिल बाफना अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६४ वर्षांचे नरेंद्र सूर्यकांत शहा हे व्यवसायाने व्यावसायिक असून ते दहिसरच्या छत्रपती शिवाजी कॉम्लेक्स रोड क्रमांक चार परिसरात राहतात. त्यांचा रियल इस्टेटसह फायनान्सचा व्यवसाय असून दहिसरच्या शिवगंगा इमारतीमध्ये त्यांचे स्वतचे एक खाजगी कार्यालय आहे. त्यांनी नवीन गृहप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात फायनान्सासह मोठी गुंतवणुक केली आहे. त्यांच्या कामानिमित्त त्यांची रियल इस्टेट एजंट सुनिल बाफनाशी ओळख झाली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची र्किती मेहता आणि किरण मेहता यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांची श्रीजी कन्स्ट्रक्शन नावाची एक बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनी असून याच कंपनीत ते दोघेही संचालक म्हणून काम पाहतात. त्यांच्या कंपनीला कांदिवलीतील परिसरातील काही एसआरए इमारतीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले होते. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यांचा प्रोजेक्ट कांदिवलीसारख्या उच्चभू आणि प्रतिष्ठित परिसरात असल्याने त्यात गुंतवणुक करणार्या व्यक्तीला भविष्यात त्याचा चांगला फायदा होणार होता. त्यामुळे र्किती मेहता आणि किरण मेहता यांनी त्यांना त्यांच्या पुर्नविकास इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. त्यामोबदल्यात त्यांनी त्यांना एसआरए इमारतीमध्ये त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावाने सात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत सातही फ्लॅटचे सेल ऍग्रीमेंट करुन त्याचे बोरिवलीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या नावाने १ कोटी ७५ लाख ५४ हजार ४५० रुपये धनादेशाद्वारे दिले होते. शासनाच्या नियमानुसार स्टॅम्प ड्युटीचे २३ लाख ७५ हजार, रजिस्ट्रेशनचे २ लाख १० हजार, व्यवहारासाठी लागणारे जीएसटीची दहा लाख, सात फ्लॅटच्या पार्किंगसाठी प्रत्येकी पाच लाखाप्रमाणे ३५ लाख रुपये आणि सुनिल बाफना याला कमिशन म्हणून सहा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांना २ कोटी ४३ लाख ३९ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. २०२२ साली किर्ती आणि किरण मेहता यांनी त्यांचा प्रोजेक्ट त्यांना न कळविता रुपारेल रियालिटी या कंपनीला दिला होता. यावेळी या दोन्ही कंपन्यांमध्ये कायदेशीर करार झाला होता. मात्र या करारात त्यांना विक्री करण्यात आलेल्या सातही फ्लॅटचा कुठेही उल्लेख नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर र्किती आणि किरण मेहता यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी रुपारेल रियालिटी कंपनीला घडलेला प्रकार सांगून त्यांच्या फ्लॅटविषयी विचारणा केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
अशा प्रकारे सुनिल बाफनाने र्किती मेहता आणि मोना मेहता यांच्या मदतीने त्यांच्या पुर्नविकास इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल असे सांगून त्यांच्यासोबत सात फ्लॅटचा करार केला, मात्र फ्लॅट न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच नरेंद्र शहा यांनी कांदिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किर्ती आणि मोना मेहता यांच्याविरुद्ध पोलिसांनी ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.