मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने डॉक्टरची फसवणुक
70 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, सायन येथील लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिष दाखवून एका वयोवृद्ध डॉक्टरची चारजणांच्या टोळीने सुमारे 70 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार सायन परिसरात उघडकीस आला आहे. त्यात दोन डॉक्टरांचा समावेश असून या चौघांविरुद्ध सायन पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लव अवधकिशोर गुप्ता, डॉ. राकेश रामनारायण वर्मा, डॉ. अखिलेशकुमार राममूर्ती पाल आणि कुश गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
61 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रामचंद्र शारदाप्रसाद शुक्ला त्यांच्या पत्नी सुनिता, मुलगी वैष्णवी यांच्यासोबत सायन येथे राहतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी सुनिता व्यवसायाने डॉक्टर असून त्यांच्या मालकीचे धारावी परिसरात एक खाजगी क्लिनिक आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची मुलगी बारावी पास झाली होती. त्यानंतर तिने एमबीबीएसला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने नीटची परिक्षा दिली होती. त्यात तिला पात्रता मार्क मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला मॅनेजमेंट कोट्यातून शासकीय वैद्यकीय कॉलेजमधून प्रवेश मिळेल का याबाबत चौकशी सुरु केली होती. सायन येथील लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज, जे. जे हॉस्पिटल, डी. वाय पाटील, पालघर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये रामचंद्र शुक्ला यांनी चौकशी केली होती. मात्र त्यांच्या मुलीला कुठेच प्रवेश मिळाला नव्हता. याच दरम्यान ते लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेजमध्ये डॉ. राकेश वर्मा यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या मुलीला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते.
याच दरम्यान त्यांची सायन येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीत डॉ. अखिलेशकुमार पाल यांनी त्यांच्या मुलीच्या मेडीकल प्रवेशासाठी एक कोटीची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यांच्याकडे एक कोटी नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना लव गुप्ता गुप्ता यांच्याकडे नेले होते. तिथेच त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात 70 लाख रुपये देण्याचे ठरले होते. घरी आल्यांनतर त्यांनी त्यांच्या पत्नीसह मुलीशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी बेलापूर येथील कार्यालयात लव गुप्ता आणि कुश गुप्ता यांची भेट घेऊन 70 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी डॉ. राकेश वर्मा आणि डॉ. अखिलेशकुमार पाल यांच्या सांगण्यावरुन लव गुप्ता आणि कुश गुप्ता यांना सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 70 लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांना त्यांच्या मुलीचे मेडीकलमध्ये प्रवेश नक्की झाल्याचा एक मेल आला होता.
तीन दिवसांनी त्यांनी त्यांना त्यांच्या मुलीचे सायन येथील लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेजमधील प्रवेशाचे पत्र दिले होते. मार्च 2021 पासून तिचे नियमित ऑनलाईन क्लासेस सुरु होणार होते. त्यामुळे ती प्रत्येक लेक्चरला उपस्थित राहत होती. काही दिवसांनी तिला लेक्चरमध्ये केवळ पाचजण उपस्थित असल्याचे दिसून आले. ते सर्व लेक्चर ऑडिओच्या माध्मयातून सुरु होते. तिने तिचे प्राध्यापक अनुपम पाटील यांना कधीच पाहिले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच वैष्णवीने तिने हा प्रकार तिचे वडिल रामचंद्र शुक्ला यांना सांगितला. त्यानंतर ते स्वत लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेजमध्ये गेले होते. तिथे त्यांनी अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी वैष्णवीने त्यांच्या मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशन झाले नाही. तसेच त्यांच्याकडे असलेले अॅडमिशनचे पत्र बोगस असल्याचे सांगितले. या प्रकारानंतर त्यांनी लव गुप्ता, राकेश वर्मा, अखिलेशकुमार पाल आणि कुश गुप्ता यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. सतत मागणी करुनही त्यांनी त्यांचे 70 लाख रुपये परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायन पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लव गुप्ता, राकेश वर्मा, अखिलेशकुमार पाल आणि कुश गुप्ता या चौघांविरुद्ध पोलिसांनी बोगस प्रवेशाचे पत्र देऊन 70 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चौघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.