दुप्पट रक्कमेच्या आमिषाने फसवणुक करणार्या त्रिकुटास अटक
चिल्ड्रन बँकेच्या बोगस नोटा देऊन फसवणुक करत असल्याचे उघड तिन्ही आरोपीकडून आठ लाखांचे चिल्ड्रन बँकेच्या बोगस नोटा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दुप्पट रक्कमेच्या आमिषाने कांदिवलीतील एका व्यापार्याची फसवणुक करणार्या त्रिकुटास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अब्दुल कादिर अमानतुल्ला खान ऊर्फ गुड्डू, सौद आलम रकिबुद्दीन आणि रमेश वालचंद यादव अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
संतोष लक्ष्मण सुवर्णा हे व्यापारी असू कांदिवलीतील हनुमाननगर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. बुधवारी ७ फेब्रुवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन गुड्डू नावाचा एक इसम गुंतवणुक रक्कमेवर दुप्पट रक्कम देत असल्याची माहिती दिली. तुम्हाला दुप्पट रक्कम करायचे असेल तर त्याल फोन करा असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र काही वेळानंतर त्यांना गुड्डू नावाच्या व्यक्तीने फोन करुन दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून अंधेरीतील साई पॅलेस हॉटेलजवळ बोलाविले होते. त्याला दोन लाखांची गरज आहे, ही रक्कम त्याच्याकडे गुंतवणुक केल्यास त्यांना काही दिवसांत दुप्पट रक्कम देतो असे सांगितले. त्यासाठी त्याला आगाऊ काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला सात हजार रुपये पाठवून दिले होते.
गुरुवारी दुपारी ते गुड्डूला भेटण्यासाठी अंधेरी येथील अंधेरी-कुर्ला रोडवरील हरे राम हरे कृष्णा हॉटेलमध्ये भेटण्यसाठी गेले होते. दुपारी तीन वाजता गुड्डू हा त्याच्या दोन सहकार्यासोबत आला होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याच्याकडील बॅगेतील नोटांचे बंडल दाखविले. मात्र त्या नोटा उघडून दाखविण्यास त्याने नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे जाऊन तिन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांची नावे अब्दुल कादिर खान ऊर्फ गुड्डू, सौद रकिबुद्दीन आणि रमेश यादव असल्याचे उघडकीस आले. यातील गुड्डू हा कल्याणच्या टिटवाळा, सौद दिल्लीच्या रोहिणी तर रमेश हा सांताक्रुजचा रहिवाशी आहे. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात आठ लाखांचे चिल्ड्रन बँक लिहिलेल्या बोगस नोटा सापडल्या. या प्रकारानंतर संतोष सुवर्णा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या तिघांची पोलिसांकडून चोकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.