नऊ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मायलेकाला अटक

क्लिनिकल रिसर्चसाठी नऊ कोटीचा अपहार केल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – नवी मुंबईतील डी. वाय पाटील मेडीकल कॉलेजमध्ये सुरु असलेल्या क्लिनिकल रिसर्चमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका 47 वर्षांच्या व्यावसायिकाची सुमारे नऊ कोटीची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या वॉण्टेड महिलेसह तिच्या मुलाला अखेर आंबोली पोलिसांनी अटक केली. आर्जूबानो अहतेशामुद्दीन सय्यद आणि सैफउद्दीन अहतेशामुद्दीन सय्यद अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शैरा अहमद खान हे अंधेरीतील न्यू लिंक रोड, सिटीमॉलसमोरील गल्ली, ओबेरॉय स्प्रिंग अपार्टमेंटमध्ये राहत असून ते व्यावसायिक आहेत. ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांची शहनिला सय्यद या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. तिने त्यांना ती डॉक्टर असून ती कॅन्सर रोगावरील उपचारासाठी नवी मुंबईतील डी. वाय पाटील कॉलेजमध्ये क्लिनिकल रिसर्च करत आहेत. या क्षेत्रात अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे त्यांनी तिच्या क्लिनिक रिसर्चसाठी गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्यांना दुप्पट रक्कमेसह दरमाह चार ते पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिला 30 ऑक्टोंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दहा कोटी पंचवीस रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. ही रक्कम तिच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.

काही महिन्यानंतर तिने त्यांना एक कोटी अठरा लाख रुपये परतावा म्हणून दिले होते. मात्र नंतर तिने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिच्याकडे विचारणा सुरु केली होती. मात्र तिच्याकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. ती त्यांच्या कॉलही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे गुंतवणुक केलेली रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र तिने पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. क्लिनिकल रिसर्चसाठी सव्वादहा कोटी रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिने एक कोटी अठरा लाख रुपये परत करुन उर्वरित नऊ कोटी सात लाखांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी आंबोली पोलिसात शहनिला सय्यदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना आर्जूबानो आणि सैफउद्दीन या आरोपी मायलेकांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page