अरुण सावरटकर
२७ मार्च २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील हिताची कंपनीची साडेनऊ कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी कंपनीने विमा सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या प्रमोदकुमार पदमचंद्र जैन याला वनराई पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा दाखल होताच प्रमोदकुमार हा गेल्या एक महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत करणराज पी साही आणि स्वाती राजपूत या खाजगी कंपनीच्या दोन संचालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
जेम्स फिलीप हे गोरेगाव परिसरात राहत असून हिताची कंपनीत उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ऑक्टोंेबर २०१२ रोजी या कंपनीने लॉजिकॅश सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी एक करार केला होता. या करारात बँकेतून कॅश घेऊन ती कॅश विविध बँकेच्या एटीएममध्ये जमा करणे आणि काढणे असे नमूद केले होते. मात्र या कंपनीने ९ कोटी ८४ लाख रुपयांचा परस्पर अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच कंपनीकडून लॉजिकॅशच्या संचालकांना जाब विचारण्यात आला होता. यावेळी कंपनीचे संचालक करणराज साही यांनी या फसवणुकीची कबुली देताना कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले होते. चार वर्षांपूर्वी हिताची कंपनीच्या वतीने हैद्राबाद, नामपल्ली, सेंट्रल क्राईम ब्रॅचमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कंपनीच्या संचालकासह इतर कर्मचार्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच लॉजिस्टिक कंपनीचे संचालक करणराज साही यांनी कंपनीतील काही पैशांची एका खाजगी बँकेत गुंतवणुक करुन विमा काढला होता. काही दिवसांनी करणराज साहीने विम्यासाठी अर्ज करताना तक्रारदाराच्या कंपनीकडून काही कागदपत्रांची मागणी केली होती. क्लेमची रक्कम मिळताच त्यांना त्यांची ९ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम परत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे हिताची कंपनीने विमा सल्लागार म्हणून प्रमोद जैन यांची नेमणूक केली होती. याबाबत प्रमोदसोबत कंपनीचा एक करार झाला होता. त्यासाठी कंपनी त्याला एक लाख रुपयांचे वेतन देत होते. या करारानंतर त्याच्या सांगण्यावरुन हिताची कंपनीने लॉजिस्टिक कंपनीला क्लेमसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. यावेळी करणराजने पॉलिसीमध्ये हिताची कंपनीला अंडर बेनीफिशरी करण्यात आले होते. तसे पत्र संबंधित विमा कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर हिताची कंपनीकडून विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केला जात होता.
गेल्या वर्षी मार्च महिन्यांत लॉजिस्टिक कंपनीच्या खात्यात साडेनऊ कोटीची विम्याची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम हिताची कंपनीच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र करणराज, प्रमोद आणि स्वाती राजपूत यांनी संगनमत करुन ही रक्कम परस्पर लाजिस्ट्रिक कंपनीत जमा केली होती. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने जेम्स फिलीप यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लॉजीकॅश कंपनीचे संचालक करणराज साही, विमा सल्लागार प्रमोद जैन आणि विमा कंपनीची संचालक स्वाती राजपूत या तिघांविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन हिताची कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वनराई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच वॉण्टेड असलेल्या प्रमोदकुमार जैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोटार्र्ने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत करणराज आणि स्वाती यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.