डेटींग अॅपच्या माध्यमातून फसवणुक करणार्या टोळीची पर्दाफाश
सहा तरुणीसह 21 जणांना नवी मुंबईतील हॉटेलमधून अटक
अरुण सावरटकर – राजू परुळेकर
5 जुलै 2025
मुंबई, – डेटींग अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुक करणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकवीस आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ही टोळी गेल्या पाच दिवसांपासून नवी मुंबईतील एका हॉटेलमधून ऑनलाईन फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटक आरोपींमध्ये पंधरा पुरुषासह सहा तरुणींचा समावेश असून ते सर्वजण दिल्ली आणि उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यातील तक्रारदार तरुण 26 वर्षांचा असून तो सांताक्रुज येथे राहतो. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत तो लोन रिकव्हरीचे काम करतो. एप्रिल महिन्यांत टिंडर अॅपच्या माध्यमातून त्याची दिशा शर्मा या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. बोरिवलीतील एक्सर परिसरात राहत असल्याचे सांगून दिशाने त्याला तिथे भेटायला बोलाविले होते. 12 एप्रिलला तो तिला भेटण्यासाठी गेला होता.
काही वेळानंतर ते दोघेही टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी जेवणासह हुक्का मागविला होता. दोन तासांनी वेटर त्यांच्याकडे 35 हजाराचा बिल घेऊन आला होता. ते बिल पाहून त्याला धक्काच बसला होता. यावेळी त्याने बिल जास्त असल्याने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी 30 हजाराचे नवीन बिल दिले. यावेळी दिशाने पंधरा हजार रुपये देते असे सांगून त्याला उर्वरित पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर त्याने क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट केले होते. पेमेंट झाल्यानंतर दिशा तेथून निघून गेली होती. घरी आल्यानंतर त्याला त्याचे पेमेंट हॉटेलच्या नावाने जमा झाले नसून मोहम्मद तालिब या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. दिशा शर्मा हिने हॉटेलमधील उपस्थित लोकांच्या मदतीने त्याची ऑनलाईन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. त्याच्या तक्रारीनंतर दिशा शर्मासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पाटील, पोलीस उपनिरीक्षक वसीम शेख, निलेश पाटील, सहाय्यक फौजदार खरात, पोलीस हवालदार साळुंखे, पोलीस शिपाई मोरे, महिला पोलीस शिपाई पाटील, मस्के, मंजुळे यांनी तपास सुरु केला होता.
आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर आणि करंट लोकेशन प्राप्त करण्यात आले होते. त्यात संशयित आरोपी गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील दिघा परिसरात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने गुरुवारी 3 जुलैला रात्री उशिरा नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 21 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात सहा तरुणींचा समावेश होता. तपासात ऑनलाईन फसवणुक करणारी ही एक आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण दिल्ली आणि उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही टोळी नवी मुंबईतील हॉटेलमध्ये राहत होती. डेटींग अॅपच्या माध्यमातून टोळीतील तरुणी काही तरुणांशी संपर्क साधून मैत्री करत होती. त्यांच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या तरुणींच्या नावाने बोगस प्रोफाईल सापडले असून त्यांनी या तरुणीचे बोगस आयडी बनविले होते. या आयडीवरुन ते तरुणांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांची फसवणुक करत होते. बोगस बिल सादर करुन पोर्टेबल प्रिंटर आणि स्वाईप मशीनव्या मदतीने ही फसवणुक केली जात होती.
हा प्रकार उघडकीस येताच पंधरा पुरुषासह सहा तरुणी अशा 21 जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना शुक्रवारी सायंकाळी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज, कॅश, मोबाईल, बँकेचे डेबीट व क्रेडिट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींची चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेने मुंबईसह देशभरातील विविध डेटींग अॅप फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.