राजू परुळेकर
18 जुलै 2025
मुंबई, – एक वर्षांसाठी मुंबई शहरातून तडीपारची कारवाई सुरु असताना शहरात अनधिकृतपणे प्रवेश करुन रिक्षा चालविणाया एका तडीपार रिक्षाचालकाला समतानगर वाहतूक पोलीस चौकीच्या अधिकार्यांनी अटक केली. नियमांचे उल्लंघन करुन पळून जाणार्या या रिक्षाचालकाला पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे व पोलीस हवालदार विकास पोळ यांनी ताब्यात घेतल्यानंतर तो तडीपार गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकावर वाहतूक पोलिसांकडे कारवाई केली जाते. दोन दिवसांपूर्वी समतानगर वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे व पोलीस हवालदार विकास पोळ हे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात वाहतुक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकावर कारवाई करत होते. यावेळी पोलिसांना एक रिक्षाचालक नो इंट्रीमधून रिक्षा नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुसाट वेगात तेथनू पळून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच जगदीश भोपळे व विकास पोळ यांनी त्याचा पाठलाग केला.
काही अंतर गेल्यानंतर त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो तडीपार गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. केदार नाव असलेला हा आरोपी कांदिवलीतील आकुर्ली रोड, बाजी प्रकाश चाळीत राहतो. त्याच्यावर समतानगर पोलिसांनी एक वर्षांसाठी मुंबई शहरातून तडीपारची कारवाई केली होती. नोव्हेंबर 2024 रोजी ही कारवाई करण्यात आली होती. त्याची मुदत नोव्हेंबर 2025 मध्ये संपणार होती. मात्र ही कारवाई सुरु असताना तो अनधिकृतपणे मुंबईत आला होता. त्यानंतर तो भाड्याची रिक्षा चालवत होता.
मात्र नो इंट्रीमध्ये रिक्षा नेऊन त्याने वाहतूक नियमांचे उल्लघंन केले, तिथेच तो फसला गेला. त्याला रिक्षासह नंतर समतानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तडीपार कारवाईचे उल्लघंन करुन मुंबईच्या हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे आणि पोलीस हवालदार विकास पोळ यांच्या सतर्कमुळे एका तडीपार गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.