मूल दत्तक देण्याच्या आमिषाने महिलेची नऊ लाखांची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी
अरुण सावरटकर
३ एप्रिल २०२४
मुंबई, – मूल दत्तक देण्याच्या आमिषाने एका महिलेची सुमारे नऊ लाख रुपयांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी समतानगर पोलिसांनी अटक केली. साहिल अब्दुल हमीद शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मूल दत्तक घेण्यासाठी घेतलेल्या महिलेच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन साहिलने बाईकसाठी बँकेतून कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
४६ वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली येथे राहते. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तिने नर्सचा कोर्स केला होता. त्यामुळे ती पेशंट केअरटेकर म्हणून काम करत होती. लग्नाला पंधरा वर्ष उलटून तिला मूळ होत नव्हते. त्यामुळे तिने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिची प्रयत्न सुरु होते. मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रियेची ती माहिती घेत होती. याच दरम्यान एका मैत्रिणीने तिला साहिलशी ओळख करुन दिली होती. साहिल तिला मूल दत्तक घेण्यासाठी मदत करतो सांगितले होते. नोव्हेबर २०२० रोजी साहिलने तिला फोन करुन तिला एका आश्रमातून मूल दत्तक म्हणून घेऊन देतो. त्यासाठी काही पैसे लागतील असे सांगितले. तिने त्याला होकार दिला. काही दिवसांनी तो तिच्या घरी आला आणि तिच्या नावाने एक अर्ज भरुन तिची वैयक्तिक माहितीसह कागदपत्रे घेऊन गेला. यावेळी तिने त्याला एक लाख सत्तर हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने तिला एका मुलीचा फोटो पाठविला होता. मात्र नंतर त्याने त्या मुलीला कोरोना झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला दुसरी मुलगी देतो असे सांगितले. मात्र या मुलीचा एड्सने मृत्यू झाल्याचे सांगून त्याने पुन्हा तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला अन्य एका मुलीची माहिती दिली. ही मुलगी तिच्या आजीसोबत राहत असून ती मुलीचा सांभाळ करण्यास सक्षम नाही. तिचे पाच रुम असून भविष्यात ते पाचही रुम तुमच्या नावावर होईल असे आमिष दाखवून तिच्याकडून आणखीन पैशांची मागणी केली. अशा प्रकारे मूलासाठी त्याने तिच्याकडून नऊ लाख चौदा हजार रुपये घेतले होते. मात्र तिला मूल दिले नाही.
दुसरीकडे अर्जासोबत तिच्याकडून घेतलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन त्याने या कागदपत्रांवर बाईकवर कर्ज घेतले होते. त्यासाठी तिला बँकेकडून हप्ता भरण्यासाठी सतत कॉल येत होते. साहिलकडून आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच साहिल हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या साहिलला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या महिलेकडून पैसे उकाळण्यासाठीच तिला मूत दत्तक घेऊन देतो असे सांगून तिची फसवणुक केल्याची कबुली दिली. त्याची कुठल्याही अनाथाश्रात किंवा संस्थेत ओळख नव्हती. मौजमजा करण्यासाठी त्याने तिच्याकडून मिळालेल्या पैशांतून उधळपट्टी केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.