विविध टास्कद्वारे महिलेला गंडा घालणार्‍या दोघांना अटक

फसवणुकीसाठी बँक खाते उघडल्याचे दोघांवर आरोप

0

राजू परुळेकर
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – इकॉनॉमी टास्कच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका महिलेची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन ठगांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. ओंकार राजेंद्र खोमते आणि अक्षय बाबासाहेब कोलते अशी या दोघांची नावे असून या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. टास्कच्या नावाने या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून अटक आरोपींच्या इतर सहकार्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मेधा अजय गवांदे ही महिला मालाड परिसरात राहते. गेल्या 23 वर्षांपासून ती एलआयसीसह जनरल इन्शुरन्स करण्याचे काम करते. 1 डिसेंबर 2024 रोजी ती तिच्या घरी होती. यावेळी तिचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये शंभरहून अधिक सभासद होते. ग्रुपच्या अ‍ॅडमिनने तो एका खाजगी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून कंपनीचे कार्यालय वांद्रे येथील बीकेसी परिसरात असल्याचे सांगितले. ही कंपनी ऑनलाईन टास्ट देण्याचे काम करते. त्यामुळे अनेकांना घरबसल्या चांगले कमिशन मिळत असल्याचे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला गुगल मॅप लिंक पाठवून तिला रिव्ह्यू देण्यास सांगितले.

प्रत्येक रिव्हयूमागे तिला दिडशे रुपये मिळतील असे सांगितले. त्यामुळे तिने लिंक ओपन करुन तिचे रिव्ह्यू दिले होते. त्यानंतर तिच्या बँक खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास निर्माण झाला होता. काही दिवसांनी त्याने तिला टेलिग्रामवर अ‍ॅड केले होते. तिथे ज्योती नावाच्या एका महिलेने तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स घेतली होती. त्यानंतर तिला वेगवेगळे लिंक पाठवून रिव्ह्यू देण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे तिने सर्व टास्क पूर्ण झाले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात कमिशनसह बोनसची रक्कम जमा झाली होती.

याच दरम्यान ज्योतीने तिला काही हॉटेल आणि रिसॉर्टचे लिंक पाठविले होते. ते टास्कही तिने पूर्ण केले होते. आतापर्यंत तिने टास्कसाठी कुठलीही रक्कम जमा केली नव्हती. त्यामुळे लिंक ओपन करुन रिव्ह्यू देण्याचे तिचे काम सुरुच होते. त्यानंतर तिला इकोनॉमी पेड टास्कची ऑफर देण्यात आली. या पेड टास्कमध्ये तिला जास्त कमिशन मिळणार होते. मात्र त्यासाठी तिला आधी काही रक्कम जमा करावी लागणार होती. त्यामुळे तिने कंपनीच्या विविध टास्कसाठी टप्याटप्याने पैसे जमा केले होते. या टास्कमुळे तिला चांगला फायदा झाला होता. मात्र गुंतवणुकीसह कमिशनची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.

ही रक्कम मिळविण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. यावेळी त्यांनी तिच्याकडे साडेतीन लाखांची मागणी केली होती. ही रक्कम जमा केल्यानंतर तिचे सर्व पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होतील असे सांगितले. त्यामुळे तिने दिलेल्या बँक खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्स्फर केले. मात्र तिच्या बँक खात्यात तिचे पैसे जमा झाले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तिला जमा झालेल्या रक्कमेवर टॅक्ससह इतर कामासाठी आणखीन पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र तिने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तिचे कॉल घेणे बंद केले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन ओंकार खोमते आणि अक्षय कोलते या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

तपासात या दोघांच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी बँकेत खाती उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना दिली होती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा वापर फसवणुकीसाठी केला जात होता. त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम ते दोघेही संबंधित सायबर ठगांना पाठवत होते. त्यामोबदल्यात त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते.

ही माहिती उघडकीस येताच ओंकार आणि अक्षय या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page