युपीएससी परिक्षेत पास करण्याचे आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
60 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तोतया सीआयडी अधिकार्याला अटक
अरुण सावरटकर
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – युपीएससी परिक्षोत मुलाला पास करण्याचे आश्वासन देऊन एका हॉटेल व्यावसायिकाची दोन भामट्यांनी सुमारे 60 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तोतया सीआयडी अधिकार्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. याकूब गफुर शेख असे या आरोपी सीआयडी अधिकार्याचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांतितले. त्याचा दुसरा सहकारी विजय चौधरी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. विजयने तो दिल्लीचा आयुक्त तसेच युपीएससी परिक्षेत मुख्य अधिकारी असल्याची बतावणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
इर्शाद फुलमोहम्मद खान हे हॉटेल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहतात. याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. त्यांचा मुलगा सद्दाम हुसैन हा बॅचलर कॉमर्सचे शिक्षण घेत असून त्याने दिल्लीतून युपीएससी परिक्षेचा अभ्यास करुन आतापर्यंत चार वेळा युपीएससीची परिक्षा दिली होती. मात्र चारही वेळेस तो नापास झाला होता. त्यामुळे पुन्हा परिक्षेची तयारी सुरु केली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या हॉटेलमध्ये याकबू शेख हा आला होता. त्यानंतर तो त्यांच्या हॉटेलमध्ये नियमित येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख होऊन मैत्री झाली होती. त्याने तो सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून मालवणी परिसरात राहत असल्याचे सांगितले होते.
अनेकदा चर्चेदरम्यान त्यांच्यात कौटुंबिकसह मुलांचा विषय निघत होते. यावेळी इर्शाद खान यांनी त्यांचा मुलगा युपीएससीची परिक्षा देत असून चार वेळा त्याला यश आले नाही. त्यामुळे तो पाचव्यांदा परिक्षेची तयारी करत असल्याचे सांगितले. यावेळेस याकूबने परिक्षेत पास होण्यासाठी ओळख असावी लागते. ओळखीशिवाय त्यांचा मुलगा पास होणार नाही. त्यांच्या परिचित विजय चौधरी नावाचे वरिष्ठ अधिकारी परिचित असून सध्या ते दिल्लीत आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुंबईत असताना त्याची त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. विजय चौधरी हे युपीएससी परिक्षेचे मुख्य अधिकारी आहेत. परिक्षेचा निकाल त्यांच्याच हातात असतो. त्यामुळे त्यांच्या मुलाला परिक्षेत पास करुन देण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्याने त्यांच्या मुलाची सर्व माहितीसह फोटो घेतले होते.
मे महिन्यांत त्याने दिल्लीतून काही अधिकारी आले असून त्यांना काही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला काही रक्कम दिली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांचे विजय चौधरीशी मोबाईलवरुन संभाषण करुन दिले होते. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने त्यांना तो दिल्लीचा आयुक्त तसेच युपीएससी परिक्षेत मुख्य अधिकारी असल्याची बतावणी केली होती. त्यामुळे त्यांना याकूबसह विजयवर विश्वास बसला होता. 2021 रोजी इर्शाद यांचा मुलगा सद्दाम हुसैन याने पुन्हा युपीएससीची परिक्षा दिली होती. मात्र तो पास झाला नाही. त्यामुळे त्यांनी याकूबकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने विजय चौधरी मुंबईत येणार असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन नंतर बोलू असे सांगितले.
काही दिवसांनी याकूबने त्यांची विजयची एका हॉटेलमध्ये ओळख करुन दिली होती. यावेळी विजयने दुसर्या पालकांनी वरुन ओळख आणून त्यांचे काम करण्यास सांगितले होते, त्यामुळे यंदा त्यांच्या मुलाचे काम झाले नाही. तुमच्या मुलाला रिचेकिंगसाठी अर्ज करण्यास सांगा, त्याला पास करुन देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला काही पैसे ट्रान्स्फर केले होते. मात्र त्यांनी त्यांच्या मुलाचे काम केले नाही. तो मुस्लिम असल्याचे सांगून त्यासाठी त्यांना आणखीन पैसे द्यावे लागतील असे सांगितले.
अशा प्रकारे इर्शाद खान यांनी त्यांच्या मुलाला युपीएससी परिक्षेत पास करुन घेण्यासाठी याकूब आणि विजयला कॅश आणि ऑनलाईनद्वारे आतापर्यंत साठ लाख रुपये पाठविले होते. मात्र त्यांनी त्यांच्या मुलाला परिक्षेत पास करुन दिले नाही. या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच इर्शाद खान यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर याकूब शेख आणि विजय चौधरी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या याकूब शेखला पोलिसांनी अटक केली. याकबू हा मूळचा कोल्हापूरच्या म्हासरंग, भुदरगढच अनफवाडीचा रहिवाशी आहे. सध्या तो मालवणी परिसरात राहत होता. अनेकांना तो सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करुन त्याचे वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगत होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तोतया दिल्लीचा आयुक्त विजय चौधरीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध घेत आहेत.