बोगस सोने तारण ठेवून बँकेला गंडा घालणारा ठग गजाआड
गेल्या पाच महिन्यांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करुन बोगस सोने तारण ठेवून एका नामांकित बँकेला गंडा घालणार्या ठगाला गजाआड करण्यात अखेर ओशिवरा पोलिसांना यश आले. रमाकांत दिनकर भाटले असे या आरोपी ठगाचे नाव असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो गेल्या पाच महिन्यांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत सपना कुमार भट ही महिला सहआरोपी असून बोगस दागिने असल्याची माहित असताना तिने ते दागिने खरे असल्याचा अहवाल देऊन बँकेची दिशाभूल केली होती. तिच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून यातील बहुतांश गुन्ह्यांत तिला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती.
अनिलकुमार करणसिंग बलियान हे हे एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक जोगेश्वरीतील शाखेत होती. ऑक्टोंबर २०२० रोजी रमाकांत भाटलेने बँकेतून व्यवसायासाठी गोल्ड लोनसाठी अर्ज केला होता. यावेळी सोन्याचे व्हॅल्यूलेशनसाठी बँकेने सपना भट्ट हिला बोलाविले होते. तिने दागिन्यांची तपासणी करुन सपना भट्ट याने रमाकांतने दिलेले सोने खरे असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर त्याला बँकेने ५ लाख ६२ हजार रुपयांचे गोल्ड लोन दिले होते. त्यापैकी ७० हजार ३०२ रुपयांचा हप्ता त्याने बँकेत भरला, मात्र नंतर त्याने कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. याबाबत कायदेशीर नोटीस बजावून त्याने त्याचे उत्तर दिले नाही. त्यामुळे एप्रिल २०२२ रोजी त्याने सादर केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी ते सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. रमाकांतने बोगस दागिने तारण ठेवून बँकेतून गोल्ड लोन घेतले होते, ही बाब सपना भट्ट हिला माहित असूनही तिने बँकेची दिशाभूल करुन ते दागिने खरे असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे बँकेच्या वतीने अनिलकुमार बलियान यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रमाकांत भाटले आणि सपना भट्ट या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या रमाकांत भाटले याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.