ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी वकिलाला धमकाविणार्या महिलेस अटक
कुटुंबातील इतर चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु
अरुण सावरटकर
12 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरातील एका नामांकित वकिलाला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकाविणार्या निधी हरविंदरसिंग राणा या महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. खंडणीच्या याच गुन्ह्यांत निधी ही सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर चौघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांची पारुल राणा, हरविंदरसिंग राणा, मिना राणा, कोणिका वर्मा यांचा समावेश असून ते सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य आहे. हनी ट्रपद्वारे त्यांनी तक्रारदार वकिलाला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या चारही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे, विदेशी कायदे व्यापार आदींचे शिक्षण घेतले असून सध्या ते राजदूत म्हणून काम पाहतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन, वर्ल्ड ट्रेड ऑरगनायझेशन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जी 20, जी 7, ब्रिक्स, कॉमनवेल्थ, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, युनिसेफ, कॉर्प 30 मध्ये सहभाग घेतला आहे. सध्या ते ऑल इंडिया मॅन्युफेकचर संघटनेत प्रमुखपदी म्हणून कार्यरत आहेत. मे 2024 रोजी त्यांच्या कॉमन मित्रांमार्फत त्यांची पारुल राणाशी ओळख झाली होती. पारुल ही हिमाचल प्रदेशच्या सोलनच्या जोधन-जगतपूरची रहिवाशी होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.
जून 2024 रोजी ते जिनेव्हा येथे गेले होते. यावेळी पारुने त्यांना कॉल केला होता, कॉलवर ती रडत होती, त्यामुळे त्यांनी तिची चौकशी केलीहोती. तिने तिच्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांच्याकडून पाच लाखांची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तिला अडीच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान तिने तिच्या मॉडलिंग कामासाठी आणखीन अडीच लाख रुपये घेतले होते. संभाषणादरम्यान त्यांनी तिला ते विवाहीत असून त्यांना एक मुलगी असल्याचे सांगितले होते. तरीही ती त्यांना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत होती. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यानतर ती त्यांच्याकडे विविध कारण सांगून सतत पैशांची मागणी करत होते.
कधी शूटींग तर गावी जायचे आहे असे सांगून ती त्यांना दहा आणि तीन लाख रुपये पाठविण्यास सांगत होती. त्यामुळे त्यांनी तिला एअरपोर्टला भेटून तीन लाख तर दहा लाख तिची बहिण धिीला दिले होते. जुलै 2024 रोजी ते दोघेही बाली येथे फिरायला गेले होते. तिथे तिने त्यांच्याकडे पुन्हा वीस लाखांची मागणी केली होती. बाली र्टिपला प्रचंड खर्च झाल्याने त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला होता. पारुकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने ते काहीसे सावध झाले होते. त्यांनी तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील फोटो पाठविले होते. त्यांनी तिला पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराची केस करण्याची धमकी देत होती.
सोशल मिडीयासह समाजात त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करत होती. बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीत टप्याटप्याने पंधरा लाख रुपये दिले होते. तरीही ती त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती, ते तिला पैसे पाठवत होते. पैसे पाठविले नाहीतर तिचे वडिल हरविंदरसिंग राणा, आई मिना, बहिण निधी, कोणिका हे त्यांना कॉल करुन धमकावत होते. पारुवर लैगिंक अत्याचार केला आहे, तुला आता सोडणार नाही अशी धमकी देत होते. गेल्या वर्षभरात त्यांनी पारुलसह तिची बहिण तसेच कुटुंबियांना टप्याटप्याने 32 लाखांहून अधिक रक्कम दिली आहे. तरीही त्यांच्याकडून त्यांना सतत ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी होत असल्याने ते प्रचंड मानसिक तणावात होते.
या धमक्यांना कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर महिन्यांत त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राणा कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पारुल राणा, तिची बहिण निधी, कोणिका, वडिल हरविंदरसिंग आणि आई मिना यांच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणीसाठी ब्लॅकमेल करुन बदनामीची धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु होता.
आरोपींचा शोध सुरु असताना दोन दिवसांपूर्वी निधी राणा हिला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिच्या आई-वडिलासह दोन्ही बहिणींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.