होलसेल कपडे विक्रीसह एक्सपोर्टच्या नावाने फसवणुकीचा प्रकार उघड
कर्मचार्याच्या नावाने बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणुक
अरुण सावरटकर
18 डिसेंबर 2025
मुंबई, – होलसेल कपडे विक्रीसह एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु करणार असल्याची बतावणी करुन बेरोजगार तरुणांना नोकरीची ऑफर देऊन सॅलरीसाठी त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन विविध बँकेत खाती उघडून फसवणुक करणार्या एका टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित संदीपकुमार राजेशकुमार नाहता ऊर्फ हितेश नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या टोळीने त्यांच्या कर्मचार्याचे बोगस कंपन्याच्या नावाने बँक खाती उघडून त्यात कोट्यवधी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत दोन बँक खात्यात 1 कोटी 52 लाख रुपये जमा झाले असून इतर बँक खात्यात अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत मोहित शर्मा ऊर्फ वीर आणि सौरभ शेठी ऊर्फ तेजस या दोघांचा सहभाग उघडकीस आला असून या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
40 वर्षांचा तक्रारदार सागर नरोत्तम ठाकूर मूळचा गुजरातचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत भाईंदर येथे राहतो. गेल्या वर्षी तो एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. सध्या तो बेरोजगार असून नोकरीच्या शोधात होता. नोव्हेंबर 2024 रोजी त्याच्या मित्राने त्याची ओळख मोहित शर्मा ऊर्फ वीरशी करुन दिली होती. तो होलसेल कपडे विक्री आणि एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु करत आहे. त्याच्याकडे नोकरी असून तो त्याला दरमाह 35 हजार रुपये देईल असे सांगितले होते. त्यामुळे तो त्याला भेटण्यासाठी बोरिवलीला गेला होात. यावेळी मोहीतने त्याला जॉब ऑफर देत त्याला पगारासाठी बँकेत खाते उघडण्याचा सल्ला दिला होता. यावेळी सागरने त्याचा मित्र राजेश सदानंद गुरव या मित्राविषयी विचारणा केली होती. यावेळी मोहीतने त्याला नोकरी देताना बँक खाते उघडण्यास सांगितले होते.
या दोघांकडून त्याने त्यांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेतले होते. डिसेंबर 2024 रोजी मोहितने गोरेगाव येथील टोपीवाला सेंटरमध्ये एक कार्यालय भाड्याने घेतले होते. या गाळ्याच्या करारावर मोहीतच्या सांगण्यावरुन सागर आणि राजेश तर गाळा मालकाने स्वाक्षरी केली होती. 7 जानेवारी 2025 रोजी कंपनीचे काम सुरु झाले होते. या कंपनीत मोहीत शर्मा हा मालक तर संदीपकुमार नाहता अकाऊंटट म्हणून काम पाहत होते. काही दिवसांनी त्यांच्या कार्यालयात वेगवेगळ्या बँकेचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी बँकेत खाते उघडण्यासाठी सागर आणि राजेशचे कागदपत्रे घेतले होते. या कागदपत्रांवर मोहित हा वेगवेगळ्या कंपन्यांचे नावे, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी देत होता. या मोबाईलवर येणारे ओटीपी त्याने बँक कर्मचार्यांशी शेअर केले होते.
बँक खाते त्यांच्यावर नावावर असले तरी मोबाईल क्रमांक मोहितने दिले होते. बँक खाते सुरु होताच मोहितने त्यात वीस हजार रुपये ट्रान्स्फर त्याचा पगार म्हणून ट्रान्स्फर केले होते. बँक खाते ओपन होऊन कार्यालयात विविध बँकेचे प्रतिनिधी येत होते. ते त्यांच्या कागदपत्रांवरुन त्यांचे इतर अकाऊंट ओपन करत होते. कपड्याचे लवकरच आयात-निर्यातीचे काम सुरु असून त्यासाठी बँकेत वेगवेगळे खाते उघडण्यात येत आहे असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचे काम सुरु ठेवले होते. बँकेचे व्हेरीफिकेशन झाल्यानंतर बँकेतून येणारे सर्व दस्तावेज संदीपकुमार आणि त्याचा सहकारी सौरभ शेठी हे मोहितला देत होते. बँकेचे संंबंधित किट्स सागर हा मोहितच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या पोर्टलवर पाठवत होता.
जानेवारी महिना संपल्यानंतर तिथे कपडे विक्रीचे काम सुरु झाले नव्हते. त्यामुळे ते दोघेही मोहीतकडे विचारणा करत होते. मात्र मोहीत त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सागरने त्याच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा निर्णय घेतला होता. दुसर्या दिवशी तो बँकेत गेला आणि त्याने बँकेचे स्टेटमेंट प्राप्त केले होते. त्यात त्याला त्याच्या नावाने उघडण्यात आलेल्या गॅलेक्सी कार्पोरेशन कंपनीच्या नावाने बँक खात्यात 1 कोटी 12 लाख 74 हजार 475 रुपये जमा झाल्याचे दिसून आले. बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्याने मोहितला बँकेचे स्टेटमेंट दाखवून त्याला जाब विचारा होता.
यावेळी मोहितसह संदीपकुमार आणि सौरभ यांनी त्याची समजूत काढून वेगवेगळ्या कारण सांगून प्रकरण दडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सागरने त्याच्या नावाने दुसर्या बँकेत उघडलेल्या बँक खात्याची माहिती काढली होती. त्यातही त्याच्या नावाने गॅलेक्सी कार्पोरशन या कंपनीच्या बँक खात्यात 39 लाख 78 हजार 852 रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले. 15 नोव्हेंबर 2024 ते 19 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोहित, संदीपकुमार आणि सौरभ यांनी त्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत उघडले असून त्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे त्याला समजले होते. हा प्रकार समजल्यानंतर त्याने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संदीपकुमार, मोहित आणि सौरभ या तिघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासात ही टोळीने अनेकांना होलसेल कपडे विक्री आणि एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु करत असल्याची माहिती करुन त्यांना नोकरीची ऑफर देत होते. नोकरी दिल्यानंतर त्यांना सॅलरीसाठी वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यात प्रवृत्त करत होते. त्यांच्या नावासह कागदपत्रांचा दुरुपयोग करुन या टोळीने वेगवेगळ्या बँकेत विविध बोगस कंपन्यांच्या नावाने खाती उघडून त्यात कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीसाठी ही टोळी सायबर ठगांना बँक खात्याची माहिती पुरवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना संदीपकुमार नाहता याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली देताना तो मोहितच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बँकेत खाती उघडत असल्याचे सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच गुन्ह्यांत कटाचा मुख्य सूत्रधार मोहित शर्मा व त्याचा सहकारी सौरभ शेठी हे दोघेही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांनी उघडलेल्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असून या सर्व बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.