नॅशनल सिक्युरिटी अॅक्टच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक
वयोवृद्ध महिलेला 25 लाखांना गंडा घालणार्या भामट्याला अटक
अरुण सावरटकर
19 डिसेंबर 2025
मुंबई, – तस्करीमार्गे आणलेल्या सोने आणि क्रुड ऑईलच्या व्यवहारात दोन कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करुन नॅशनल सिक्युरिटी अॅक्टच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे 25 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी 52 वर्षांच्या भामट्याला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सुनिल रामकृष्ण शिरोडकर असे या आरोपीचे नाव असून तो कुर्ल्याचा रहिवाशी आहे. सायबर ठगांसाठी त्याने स्वतची रिलायबल इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीचे बँक खाते उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
78 वर्षांची सेशील वेन्सी डिसोझा ही महिला मालाड परिसरात राहत असून सध्या सेवानिवृत्त आहे. 5 डिसेंबरला तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो संदीप राव असल्याचे सांगून सध्या नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिच्या आधारकार्डचा वापर करुन एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले होते. तस्करीमार्गे आणलेले सोने आणि क्रुड ऑईल विक्री करुन त्यात दोन कोटीचा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे असे सांगितले.
याच दरम्यान त्याने तिला व्हिडीओ कॉल करुन शासकीय मुद्रा, शिक्के असलेले सर्वोच्च न्यायालयाचे तिच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले अटक वॉरंट दाखविले होते. तिच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर आहे. तिचा मोबाईल सव्हेलन्सवर ठेवण्यात आहेत. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईलपर्यत तिला कोणालाही संपर्क साधता येणार नाही. तिने दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास तिच्यावर तिच्या राहत्या घरी येऊन पोलिसांकडून अटकेची कारवाई होईल अशी भीती दाखविली होती. काही वेळानंतर त्याने तिच्या बँक खात्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. नॅशनल सिक्युरिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने तिचे सर्व बँक ाती सील होणार आहे. त्यामुळे तिच्या बँक खात्यातील रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.
चौकशी पूर्ण होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. अटकेच्या भीतीने तिने तिच्या बँक खात्यातील सुमारे 25 लाखांची रक्कम संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला होता. मात्र पैसे ट्रान्स्फर होताच तिची कोणीही चौकशी केली नाही किंवा चौकशीनंतर तिची रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगूनही संदीप रावने ती रक्कम तिला परत पाठविली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने तिने सायबर हेल्पलाईलसह उत्तर प्रादेशिक विभागाला घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणीसाठी धमकी देणे, पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खेत्रे, संदीप पांचागणे, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, सुनिल नागौडा, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शिंदे यांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी कुर्ला येथून सुनिल शिरोडकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत सुनिल हा रिलायबल इंटरप्रायजेस या कंपनीचा मालक असून सध्या कुर्ला येथील न्यू मिल रोड, तानाजी चौक, शत्रुंजय सोसायटीमध्ये राहतो. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्याच्या बँक खात्यातून ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविण्यात आले असून त्यातील काही बँक खाती गुजरातच्या सुरत शहरात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी सुरत येथे नेण्यात आले होते. या गुन्ह्यांंत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.