शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्या त्रिकुटास अटक
तीन गुन्ह्यांत तीन कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस
अरुण सावरटकर
22 डिसेंबर 2025
मुंबई, – चांगला परताव्याच्या आमिषाने अनेकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. विलास गेणू मोरे ऊर्फ रेहान खान, रिझवान शौकतअली खान आणि कासिम रिझवान शेख अशी या तिघांची नावे असून त्यांच्या अटकेने अशाच तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिन्ही गुन्ह्यांतील फसवणुकीचा आकडा तीन कोटीचा पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आकाश उमेश कांबळे हा 20 वर्षांचा तरुण कांदिवलीतील महावीरनगर परिसरात रहतो. सध्या तो सांताक्रुज येथील एल. एस. रेहजा कॉलेजमध्ये फायानान्स विभागात शेवटच्या वर्षांत शिकतो. त्याच्या वडिलांचा व्यवसाय आहे. त्याला शेअरमार्केटमध्ये गुंतवणकीची आवड असून त्याने शेअरमध्ये गुंतवणुक केली आहे. 17 ऑक्टोंबरला तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याला 100 डीबीएस ग्रुप-स्टॉक मार्केट नेव्हीगॅशेन या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्यात 258 सभासद होते. या सर्वांना रजत शर्मा नावाचा व्यक्ती शेअरमार्केट गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना फायदा होईल याबाबत माहिती सांगत होता.
काही दिवस त्याने ग्रुपमधील सभासदांच्या शेअर गुंतवणुकीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याने त्याच्या वैयक्तिक शेअरमार्केट प्लॅटफॉर्मवर शहानिशा केली असता ग्रुपमध्ये प्रसिद्ध होणारी माहिती खरी होती. विशेष म्हणजे अनेकांना अनेकांना शेअरमधील गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्याने या ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मीना भट या महिलेने त्याला एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्याने विविध शेअरमध्ये काही रक्कमेची गुंतवणुक केली होती.
सुरुवातीला त्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा तसेच त्याच्या बँक खात्यात काही परताव्याची रक्कम प्राप्त झाली होती. हा प्रकार त्याने त्याच्या आई-वडिल, मामा, मित्र-मैत्रिणींना सांगितला होता. त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांनी त्याला शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे ट्रान्स्फर केले होते. 4 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरला त्याने विविध शेअरमध्ये 23 लाख 14 हजार 100 रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यात त्याला 80 लाखांचा फायदा झाल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे त्याने काही रक्कम विड्राल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ही रक्कम काढता आली नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर मीना भट हिने त्याला सर्व्हिस चार्जसह टॅक्स भरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याने काही रक्कम जमा केली, मात्र ही रक्कम जमा करुनही त्याला त्याचे पैसे मिळाले नाही. उलट मीना भट त्याला आणखीन पैसे जमा करण्यास सांगत होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 आणि उत्तर प्रादेशिक सायबर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान पोलिसांना फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढून विलास मोरे, रिझवान खान आणि कासिम शेख या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत ते तिघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बॅकेत खाती उघडले होते. या बँक खात्यात आतापर्यंत कोट्यवधी रुपये जमा झाले होते, ही रक्कम त्यांनी सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यासाठी या तिघांनाही काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती.
त्यांच्या अटकेने फसवणुकीसह आयटीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या तिन्ही गुन्ह्यांत आतापर्यंत तीन कोटीची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील बहुतांश रक्कम त्यांच्याच बँक खात्यात जमा झाली होती. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील हे करत आहेत.