फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दिल्लीचा बोगस आयपीएस अधिकारी गजाअड

सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
24 डिसेंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका दिल्लीच्या बोगस आयपीएस अधिकार्‍याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. निलेश काशिराम राठोड असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर दोन सहकार्‍याचा सहभाग उघडकीस आला आहे. सचिन कृष्णा सावंत आणि करण सिंघानिया अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सेंट्रल एक्साईज विभागात सरकारी नोकरीच्या आमिषाने या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते.

प्रकाश नरेंद्र उदेशी यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दहिसर येथे राहतात. दहिसर येथील साईकृपा मॉलमध्ये त्यांच्या मालकीचे एक खाजगी कार्यालय आहे. सचिन कृष्णा सावंत हा त्यांचा परिचित असून गेल्या तीन वर्षांपासून ते सचिनला ओळखतात. त्याने त्यांना निलेश राठोड नावाचा दिल्लीचा आयपीएस अधिकारी असून त्याची गृहखात्यात चांगली ओळख आहे. त्यांच्या मुलाला तो सेंट्रल एक्साईज विभागात हवालदार पदावर नोकरी देऊ शकतो असे सांगितले. मात्र त्याच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. यावेळी सचिनने त्यांना तो स्वतला दिल्लीला जाऊन आला आहे. त्याने आतापर्यंत काही तरुणांना नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे तो त्याच्या मुलाला शासकीय नोकरी मिळवून देईल असे सांगितले.

नोकरीसाठी तो ठराविक रक्कम घेत असून नोकरी दिली नाहीतर तो त्यांना व्याजासहीत पैसे करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी निलेशला भेटण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांची सांताक्रुज येथील आयटीसी ग्रॅड मराठा हॉटेलमध्ये ओळख झाली होती. यावेळी निलेशसोबत त्याचा एक सहकारी करण सिंघानिया होता. या दोघांशी नोकरीविषयी चर्चा करुन त्यांनी त्यांच्या मुलाचा नोकरीसाठी फॉर्म भरुन घेतला होता. यावेळी निलेशने नोकरीसाठी किमान दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी निलेश आणि करणला टप्याटप्याने मुलाच्या नोकरीसाठी आठ लाख रुपये दिले होते.

काही दिवसांनी त्याने त्यांच्या मुलाला जे. जे हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविले होते. मेडीकलनंतर त्यांनी त्यांना त्यांच्या मुलाचे काम झाले असून त्याला लवकरच ओरिसा येथील सेंट्रल एक्साईज विभागात रुजू व्हावे लागणार आहे असे सांगितले. 29 नोव्हेंबर 2023 रोजी निलेशने त्यांना कॉल करुन त्यांच्या मुलाला ओरिसा येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघेही तिथे गेले होते. यावेळी त्यांना तिथे इतर काही तरुण नोकरीसाठी आले होते. यावेळी प्रकाश उदेशीने निलेशला कॉल केल्यानंतर त्याने त्यांच्या मुलाचे जाऊनिंग डिसेंबर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोघेही पुन्हा मुंबईत आले होते.

मात्र दोन वर्ष उलटूनही त्यांनी त्यांच्या मुलाला नोकरी दिली नाही. नोव्हेंबर 2024 रोजी त्याने त्यांना मूव्हमेंट ऑर्डरची एक प्रत देत त्यांच्याकडे उर्वरित दोन लाखांची मागणी केली होती, मात्र त्यांनी उर्वरित दोन लाख रुपये देण्यास नकार दिला. जोपर्यंत मुलाला नोकरी लागत नाही, तोपर्यंत पैसे देणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला होता. यावेळी निलेशसह करणने त्यांना कॉल करुन त्यांच्या मुलाचे काम झाले आहे, त्यामुळे त्यांना उर्वरित दोन लाख रुपये द्यावेच लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी दोन लाख रुपये दिले नाही, त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या आठ लाखांची मागणी सुरु केली होती.

मात्र त्यांनी आठ लाख रुपये परत केले नाही किंवा त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी दिली नव्हती. याच दरम्यान त्यांना आरोपींनी नोकरीबाबत त्यांना दिलेले पत्र बोगस असल्याचे समजले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच प्रकाश उदेशी यांनी निलेश राठोड, सचिन सावंत आणि करण सिंघानिया यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दिल्लीच्या बोगस आयपीएस अधिकारी निलेश राठोड याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीत त्याने सचिन सावंत आणि करण सिंघानिया यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चोकशी सुरु आहे. त्याने आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन आतापर्यंत किती लोकांची फसवणुक केली. त्यांच्याकडून नोकरीसाठी किती रुपये घेतले याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page