अरुण सावरटकर
27 डिसेंबर 2025
मुंबई, – खाजगी कंपनीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका 56 वर्षांच्या महिलेची 1 कोटी 38 लाख रुपयांच्या ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी एका आरोपीस गुजरात येथून उत्तर प्रादेशिक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. इम्रान आलियारचखान पठाण असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने रविवार 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी राहुलकुमार राजेशकुमार अग्रवाल आणि जिग्नेशकुमार बाबूभाई टेलर या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे. त्यात अमीर हलानी व उस्मानभाई यांचा समावेश आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींवर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून याच बँक खात्यात सहा गुन्ह्यांतील 3 कोटी 88 लाख रुपयांची जमा झाल्याचे उघडकीस आले.
यातील तक्रारदार महिला मिना सुधीर सिंग ही उत्तर मुंबईत राहते. फेब्रुवारी महिन्यांत तिला अदिती शर्मा आणि मयंक महेश्वरी या दोघांनी व्हॉटअपद्वारे संपर्क साधून त्यांच्या कॉन्टम सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीला तिला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून तिने 3 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 या कालावधीत संबंधित कंपनीत 1 कोटी 38 लाख 71 हजार 841 रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा किंवा मूळ रक्कम परत न करता तिची फसवणुक झाली होती.
तपासात आरोपींनी बोगस कंपनी सुरु करुन मिना सिंग यांना याच कंपनीची बोगस लिंक पाठविली होती. या लिंकच्या माध्यमातून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक सायबर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीची सुमारे सव्वाकोटीची रक्कम संजयभाई केतनभाई माळी या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाली होती.
ती रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. या बँक खात्याचा तपशील काढल्यानंतर 4 मार्च ते 7 मार्च या तीन दिवसात या बँक खात्यात 2 कोटी 16 लाख 57 हजार 616 रुपये तर देशभरातील विविध सहा गुन्ह्यांची 3 कोटी 88 लाख 84 हजार 110 रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले होते. याच बँक खात्यातून अठरा बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले होते. त्यामुळे ते सर्व बँक खाती पोलिसांनी गोठविले होते. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती, त्यात राहुलकुमार आणि जिग्नेशकुमार यांच्या बॅक खात्याचा समावेश होता. त्यामुळे राहुलकुमारला 24 जूनला तर जिग्नेशकुमार 2 जुलैला पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्या चौकशीतून इम्रानचे नाव समोर आले होते. त्यानंतर इम्रानला गुजरात येथून पोलिसांनी ताबयत घेतले होते. इम्रानविरुद्ध अशाच गुन्ह्यांची नोंद असून त्याला सुरत सायबर सेल पोलिसांनी अटक केली होती. एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा इम्रान हा मूळचा गुजरातच्या सुरत, लिंबायत, क्रांतीनगरचा रहिवाशी आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे. या सर्वांनी बँक खात्यात जमा झालेली रक्कम सायबर ठगांना पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याकामी त्यांना ठराविक रक्कम कमिशन देण्यात आले होते. तपासात आलेल्या माहितीनंतर इम्रानला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला इम्रान हा तिसरा आरोपी असून गुन्ह्यांतील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.