पदाचा दुरुपयोग करुन तिकिट बुकींगच्या 40 लाखांचा अपहार
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या कंपनीच्या कर्मचार्याला अटक
अरुण सावरटकर
28 डिसेंबर 2025
मुंबई, – सिनिअर ट्रॅव्हेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना आपल्या पदाचा गैरवापर करुन तिकिट बुकींग करुन कंपनीसह ग्राहक कंपनीची सुमारे 40 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या एका कर्मचार्याला दिड वर्षांनी अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मोहित संजय देशमुख असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या मॅनेजमेंटच्या संमतीशिवाय त्याने कंपनीच्या ग्राहकासह ग्राहक कंपनीकडून तिकिट बुकींग करुन तिकिट विक्रीतून आलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर न करता स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन ही फसवणुक केल्याचा आरोप आहे.
अंधेरी येथे जीएलटीटी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीचे कार्यालय आहे. याच कंपनीत जयराज यशवंत हरमलकर हे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतात. कंपनीचे मालक जॉर्ज थॉमस असून कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना विमान, रेल्वे, बस बुक करणे, पासपोर्ट आणि व्हिसा तयार करणे, हॉटेल बुकींग, टूर पॅकेज देणे अशा प्रकारची सेवा दिली जाते. ग्राहकांकडून तिकिट बुकींग आल्यानंतर कंपनी दुसर्या एजंट कंपनीकडून ते तिकिट बुक करुन घेतात. याच कंपनीत मोहित देशमुख हा डिसेंबर 2021 पासून सिनिअर ट्रॅव्हेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रिझर्वेशन स्टाफ म्हणून काम करत होता.
फेब्रुवारी 2024 पासून मोहीत अचानक कामावर येणे बंद झाला होता. त्यांंच्या ज्या ग्राहक कंपन्या आहे, त्यातील काही कंपन्या त्यांच्याकडे तिकिट बुक करताना आगाऊ रक्कम जमा करतात. त्यातून त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे तिकिट बुकींग करुन दिले जाते. नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीने ग्राहक कंपनीकडून काही रक्कम येणे बाकी आहे का याची तपासणी सुरु केली होती, त्यात त्यांना एका कंपनीकडून सुमारे सहा लाखांचे पेमेंट बाकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्या कंपनीला लवकरात लवकर पेमेंट करण्यास सांगण्यात आले होते. यावेळी कंपनीने त्यांनी त्यांच्या कंपनीला पेमेंट केल्याचे सांगून पेमेंट केल्याचे पुरावे सादर केले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान मोहित देशमुख याने कंपनीत काम करताना आपल्या पदाचा गैरवापर करुन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे दिसून आले. त्याने अनधिकृतपणे तिकिट बुकींग करुन त्याची रक्कम स्वतच्या बँक खात्यात जमा केली होती. चौकशीदरम्यान मे 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत मोहीतने कंपनीच्या मॅनेजमेंटच्या संमतीशिवाय विविध ग्राहकांसह ग्राहक कंपनीचे अनधिकृतपणे तिकिट बुकींग करुन 40 लाख 45 हजार 722 रुपयांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच कंपनीच्या वतीने जयराज हरमलकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहीत देशमुख याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच मोहित हा त्याच्या डोंबिवलीच्या राहत्या घरातून पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम होती. मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता.
गेल्या दिड वर्षांपासून तो फरार होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच कंपनीत गैरव्यवहार करुन कंपनीची सुमारे 40 लाख 45 हजार रुपयांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याला कोणी मदत केली आहे का, फसवणुकीच्या पैशांचा त्याने कुठे विल्हेवाट लावली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.