कंपनीची बोगस बनवून शेअर गुंतणुकीच्या नावाने 2.85 कोटींना गंडा
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक व कोठडी
अरुण सावरटकर
11 जानेवारी 2026
मुंबई, – कंपनीची बोगस वेबसाईट बनवून ग्रुप सभासदांचा विश्वास संपादन करुन त्यांना विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणार्या एका ठगाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. उर्मित राकेशकुमार सिंग असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अंधेरीतील एका वयोवृद्धाची 2 कोटी 85 लाखांची फसवणुक केली होती, या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम उर्मित सिंग याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्मित हा काही सायबर ठगांच्या संपर्कात असून त्याने त्यांच्यासाठी विविध बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
77 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जनार्दन चंदू कुईलेन हे त्यांच्या कुटुुंबियांसोबत अंधेरीतील चार बंगला, अदानी वेस्टर्न हाईट इमारतीमध्ये राहतात. ते आबूधाबी येथे नोकरी करत होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. सप्टेंबर 2025 रोजी ते त्यांच्या घरी फेसबुक पाहत होते. यावेळी त्यांना एक गुंतवणुकीसंदर्भात जाहिरात दिसून आली. ती लिंक त्यांनी ओपन केली होती. यावेळी त्यांना डी-वन एसबीआय सिक्युरिटीज ट्रेडिंग कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. या ग्रुपची पाहणी केल्यानंतर त्यात 251 सभासद होते. ग्रुप अॅडमिन सभासदांना विविध शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत होते. यावेळी त्यांना शेअरसह त्यांच्या किंमतीबाबत, इतकेच नव्हे तर या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना आगामी दिवसांत किती फायदा होईल याची माहिती दिली जात होती.
काही दिवस शेअरबाबत अंदाज घेतल्यानंतर त्यांना ग्रुप अॅडमिनने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सांगून त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांचे एक अकाऊंट उघडण्यात आले होते. या अकाऊंटमधून त्यांनी कंपनीच्या माध्यामातून विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध शेअरमध्ये 2 कोटी 85 लाख 73 हजार 718 रुपयांची गुंतवणुक केली होती. कंपनीच्या वेबसाईटवर त्यांना त्यांची गुंतवणुक रक्कम आणि त्यावरील प्रॉफिट मिळून चार कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम विड्रॉल करण्यासाठी कंपनीला रिक्वेस्ट पाठविली होती. मात्र त्यांचा क्रेडिट स्कोर कमी असल्याचे सांगून ग्रुुप अॅडमिनने त्यांना आणखीन रक्कम गुंतवणकीचा सल्ला दिला, त्याशिवाय त्यांना ही रक्कम काढता येणार नाही असे सांगितले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र त्यांनी त्यांना पैसे पाठविले नाही. याबाबत त्यांनी कंपनीची शहानिशा केल्यानंतर ती कंपनीची बोगस असल्याचे उघडकीस आले. या कंपनीने अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून अनेक सभासदांना गंडा घातला होता. बोगस कंपनीची वेबसाईट बनवून ग्रुप अॅडमिनने कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची 2 कोटी 85 लाखांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ऑनलाईन पोर्टलसह पश्चिम प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना उर्मित सिंग याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांतील मुख्य आरोपींच्या उर्मित हा संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँक खाते उघडून या बँक खात्याची माहिती संबंधित आरोपींना दिली होती. या माहितीनंतर त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम जमा झाल्यानंतर त्याने ती रक्कम आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. याकामी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती.
तपासात हा प्रकार उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.