मोहम्मद पैगंबराचा वंशज असल्याची बतावणी करुन महिलांची फसवणुक
दहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी भामट्याला अटक
अरुण सावरटकर
11 जानेवारी 2026
मुंबई, – मोहम्मद पैगंबराचा वंशज असल्याची बतावणी करुन त्याच्याकडे मोहम्मद पैगंबराचा केस असल्याचा दावा करुन या केसाजवळ सोने ठेवल्यास घरात भरभराट होईल, सोन्यामध्ये वाढ होईल असे सांगून दोन महिलांकडून घेतलेल्या सुमारे दहा लाखांचा सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी मोहसीनअली अब्दुल सत्तार कादरी नावाच्या एका भामट्याला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक अडचणीमुळे त्याने अपहार केलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्याकडून लवकरच सर्व दागिने हस्तगत केले जाणार आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्सार अहमद अब्दुल गन्नी फारुकी हे माहीमच्या कपडाबाजार, नॉवेल्टी हाईटस इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1103 मध्ये राहतात. भायखळ्यातील एका कपड्याच्या दुकानात ते नोकरी करत होते, गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांनी नोकरी सोडून दिली होती. 2022 साली डोंगरीतील हाजी अब्दुल रेहमान शहा दर्ग्यात त्यांचा भाऊ इसरार अहमद फारुकी याची मोहसीनअलीशी भेट झाली होती. यावेळी मोहसीनअलीने तो मोहम्मद पैगंबराचा वंशज असून त्याच्याकडे मोहम्मद पैगंबराच्या डोक्याचा केस असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांचा भाऊ त्याला भेटत होता.
सप्टेंबर 2022 रोजी अन्सार फारुकी यांच्या घरी ईद-ए-मिलादनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या भावाने मोहसीनअलीला तिथे आणले होते. यावेळी त्याने त्यांना मोहम्मद पैगंबराचा डोक्यांचा केस देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे तो एका काचेच्या डब्बीत केस घेऊन आला होता. घरातील सर्वांना ते केस दाखवून त्याने मुस्लिम धार्मिक पद्धतीने प्रार्थना करुन घरातील लाकडी कपाटात ठेवून कपाट लॉक केले होते. त्याने काचेच्या डब्बीतून केस कोणी काढल्यास ते जळून खाक होईल असे सांगितले होते. काही दिवसांनी मोहसीनअली सहा त्यांच्या घरी आला होता.
यावेळी अन्सार व त्यांचा भाऊ इसरार हे दोघेही घरी नव्हते. त्याचाच फायदा घेऊन त्याने त्यांच्या त्यांच्या पत्नीसह भावाच्या पत्नीला मुस्लिम धर्मगुरु घोशपाक सरकारचा आदेश आहे की, तुमच्याकडे सोन्याचे दागिने आहे. ते तुम्ही मोहम्मद पैगंबराच्या केसाजवळ ठेवल्यास त्यांच्या घरी भरभराट होईल. सोन्यामध्ये वाढ होईल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या दोघींनी त्यांच्या घरातील 145 ग्रॅम वजनाचे दहा लाख पंधरा हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने त्याला दिले होते. त्यानंतर त्याने पुन्हा प्रार्थना करुन ते सर्व दागिने कपाटात ठेवत असल्याचे सांगून कपाट बंद केले होते. मात्र याबाबत घरातील पुरुषांना काहीच सांगू नका, नाहीतर त्यांच्यावर मोठे संकट येईल असे सांगून तो निघून गेला.
तो त्यांच्या घरी नियमित प्रार्थना करण्यासाठी येत होता. मात्र त्यांना कपाटात नेत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली होती. यावेळी त्याने मुस्लिम धर्मगुरु घोशपाक यांचा आदेश नसून त्यांना लवकरच दागिने परत करणार असल्याचे सांगितले. मात्र त्याने त्यांना दागिने परत केले नाही. तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर या दोघींनी त्यांच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी कपाटात दागिन्यांची पाहणी केली, यावेळी तिथे काचेच्या डब्बीत केस मिळून आले, मात्र सोन्याचे दागिने नव्हते. त्यांच्या पत्नीने विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने मोहसीनअलीने पळवून नेले होते. याबाबत त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने तयाला आर्थिक अडचण असल्याने ते दागिने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केल्याचे सांगून त्यांना लवकरच त्यांचे सोन्याचे दागिने आणून देतो असे सांगितले.
मात्र तीन वर्ष उलटूनही त्याने त्यांना सोन्याचे दागिने परत केले नाही. मोहसीनअलीने तो मोहम्मद पैगंबराचा वंशज असल्याचे सांगून त्याच्याकडे मोहम्मद पैगंबराचा केस आहे, या केसाजवळ सोन्याचे दागिने ठेवल्यास त्यांच्या घरात भरभराट होईल, सोन्यामध्ये वाढ होईल असे सांगून त्यांच्या पत्नीकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच अन्सार फारुकी यांनी घडलेला प्रकार माहीम पोलिसांना सांगून मोहसीनअलीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मोहसीन कादरी याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.