पोलीस कुटुंबियांना देण्यात आलेल्या फ्लॅटची विक्री करुन फसवणुक
एक-दोन नव्हे तर दहा फ्लॅटची विक्री; अकराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजू परुळेकर
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी दिलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका कलादिग्दर्शकाला सुमारे तीस लाखांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कॉटनग्रीन परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वतला इमारतीचे मालक सांगणार्या तोतया मायलेकासह त्यांच्या नऊ सहकार्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरेश रामभाऊ गायकवाड, कुसुम रामभाऊ गायकवाड, देवीदयाल सोहनलाल गुप्ता, नलिनी सूर्यकांत बोराडे, राजेश सूर्यकांत बोराडे, योगेश सूर्यकांत बोराडे, भुपेंद्र सूर्यकांत बोराडे, निर्मला चंद्रप्रकाश बोराडे बोराडे, देवेंद्र चंद्रप्रकाश बोराडे, अरुणा संतोष कांदेकर आणि करुणा विजयसिंह पर्बत अशी या अकराजणांची नावे आहेत. यातील सुरेश गायकवाड आणि देवीदयाल गुप्ता हे मुख्य आरोपी असून त्यांनीच पोलिसांसाठी राखीव असलेल्या सुमारे दहाहून अधिक फ्लॅटची विक्री करुन कोट्यवधी रुपयांची गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
हितेश अनिल खुमान हे कलादिग्दर्शक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत माहीम परिसरात राहतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांची देवीदयालशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने कॉटनग्रीन येथील झकेरिया बंदर रोड, राजदूत हॉटेलजवळील लक्ष्मी इमारतीमध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यांना एका नवीन फ्लॅटची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्याला फ्लॅट दाखविण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते दोघेही सुरेश गायकवाडकडे गेले होते. यावेळी देवीदयालने सुरेश व त्याची आई यांच्या मालकीची लक्ष्मी इमारत असून ते दोघेच इमारतीचे खरे वारसदार आहेत. यावेळी सुरेशने त्यांना दुसर्या आणि तिसर्या मजल्यावरील दोन फ्लॅट दाखविले होते. त्याची ४५ लाख रुपये होती, ही किंमत त्यांच्या बजेटपेक्षा जास्त होती. त्यामुळे त्यांनी फ्लॅट खरेदी करण्यास नकार दिला. काही दिवसांनी हितेश खुमान हे सुरेशच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा तीस लाखांमध्ये सौदा झाला होता. हा फ्लॅट लवकरच पुर्नविकासासाठी जाणार असून त्यात त्यांना ४१५ चौ. फुटाचा फ्लॅट मिळेल असे सुरेशने सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला तीस लाख रुपयांचे पेमेंट केले होते. यावेळी त्यांच्यात फ्लॅटचा करार झाला होता. काही दिवसांी वरळीतील दुय्यम निबंधक कार्यालयात नलिनी बोराडे, राजेश बोराडे, योगेश बोराडे, भूपेंद्र बोराडे, निर्मला बोराडे, करुणा पर्बत, देवेंद्र बोराडे, अरुणा कांदेकर यांनी त्यांना रिलीज डिड आणि पॉवर ऑफ ऍटनीचे मूळ कागदपत्रे दाखविले. त्याद्वारे त्यांच्यात भाडेपट्ट्याचे हस्तांतरणपत्र करारनामा झाला होता. त्यात सुरेश गायकवाड आणि अमरजीत पाटील यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही.
फ्लॅटच्या दुरुस्तीच्या नावाने तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तीन ते चार महिने उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा न दिल्याने ते स्वत लक्ष्मी इमारतीमघ्ये गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या रुमसह सुरेशच्या कार्यालयाला टाळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तिथेच सुरेशविषयी चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना या इमारतीची जागा बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असून सुरेशने त्यांना विक्री केलेला फ्लॅट आणि इतर फ्लॅट मुंबई पोलीस म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असल्याचे समजले होते. या इमारतीमध्ये काही पोलीस कुटुंबिय राहत असून ते फ्लॅट फक्त पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी अलोट करण्यात आले होते. शासनाच्या मालकीची जागा आणि इमारत असल्याने नियमानुसार कोणालाही इमारतीचे फ्लॅट खरेदी-विक्री किंवा हस्तांतरीत करता येत नव्हते. ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी इतर फ्लॅटमध्ये राहणार्या रहिवाशांची चौकशी केली असता तिथे पोलीस कुटुंबिय राहत असल्याचे दिसून आले. सुरेश गायकवाड याने अशाच प्रकारे लक्ष्मी इमारतीच्या दहाहून अधिक फ्लॅटची परस्पर विक्री करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे समजले. हा प्रकार उघड होताच त्यांनी सुरेश गायकवाड आणि देवीदयाल गुप्ताला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचाही संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी सुरेशने त्यांच्याकडे पैशांसाठी काही दिवसांची मुदत मागितली. लक्ष्मी इमारतीच्या पुर्नविकासासाठी सुरेश गायकवाड याने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाला एक प्रस्ताव दिला होता. मात्र त्याचा प्रस्ताव संबंधित कार्यालयातून अमान्य करण्यात आला होता.
अशा प्रकारे मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या फ्लॅटची सुरेश गायकवाड व त्याच्या इतर सहकार्यांनी परस्पर विक्री करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. त्यामुळे हितेश खुमान यांच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी संबंधित अकराजणांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत दोषी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.