धक्का लागला म्हणून पेव्हर ब्लॉकने मारहाण करुन २२ वर्षांच्या तरुणाची हत्या

हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्‍यांना सहा तासांत गजाआड करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून कुठली घटना घडेल याचा नेम नाही. चालताना धक्का लागला म्हणून तीनजणांच्या एका टोळीने हाताने आणि पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करुन एका २२ वर्षांच्या तरुणाची हत्या करुन पलायन केले. हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना सहा तासांत गजाआड करण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे सुहेब ऊर्फ शोएब सुहेबुद्दीन ईमामुद्दीन अन्सारी असून त्याच्या हत्येप्रकरणी अनस इकरार अहमद शेख, गुल्फराज बिस्मिल्ला खान आणि अफजल सगीर अहमद सय्यद या तिघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

ही घटना रविवारी दुपारी पावणेतीन वाजता साकिनाका येथील खैराणी रोड, एम. जे स्टुडिओसमोर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सद्दाम हुसैन ईमामुद्दीन अन्सारी हा तरुण मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या साकिनाका येथील खैराणी रोड, कोल्हापूर इस्टेट परिसरात राहतो. तो कपड्यावरील जरीकाम करत असून मृत सुहेब हा त्याचा लहान भाऊ आहे. रविवारी दुपारी बारा वाजता तो दुपारचे जेवण आणण्यासाठी घरी आला होता. जेवण घेऊन तो दुपारी पावणेतीन वाजता निघाला. एम. जे स्टुडिओसमोरुन जात असताना बाईकवरुन ट्रिपल सीट जाणार्‍या आरोपींचा त्याला धक्का लागला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात या आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हाताने आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याने सुहेब हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर ते तिघेही पळून गेले होते. जखमी झालेल्या सुहेबला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या पॅरामाऊंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सद्दाम हुसैनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संभाजी साबळे, उपनिरीक्षक नांगरे, कादे, लोणकर, ससाणे व अन्य पोलीस पथकाने पळून गेलेल्या अनस शेख, गुल्फराज खान आणि अफजल सय्यद या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच सुहेबची चालताना धक्का लागल्याच्या वादातून हाताने आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्‍यांना अवघ्या सहा तासांत अटक करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी कौतक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page