शहरात चालणार्‍या दोन विविध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दोन महिलांसह दलालास अटक तर सात तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधासाठी ग्राहकांना मुली पुरविणार्‍या एका वयोवृद्धेसह दोन महिला आणि दलालास ट्रॉम्बे आणि बांगुरनग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक करुन शहरात चालणार्‍या दोन विविध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या तिघांविरुद्ध भादवीसह पिटाच्या विविध कलमांतर्गत कारवाई करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी सात तरुणींची सुटका केली असून त्यातील तीन तरुणी मूळच्या कोलकात्याच्या रहिवाशी आहे. या तरुणींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवून त्यांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात येत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मेडीकलनंतर सातही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ट्रॉम्बे येथे राहणारी प्रियांका ही महिला सेक्स रॅकेट चालवत असून ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणींना विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवित असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने प्रियांकाला संपर्क साधला होता. तिच्याकडे तीन महिलांची मागणी केली. तिच्याकडून होकार येताच तिने बोगस ग्राहकाला ट्रॉम्बे येथील शीव-ट्रॉम्बे रोडवरील कॅफे कॉफी डे हॉटेलजवळ बोलाविले होते. यावेळी तिने त्याला एका तरुणीमागे शरीर संबंधासाठी दहा हजाराची मागणी केली होती. या बोगस ग्राहकाने दहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी एक वाजता प्रियांका ही चार तरुणीसोबत कॅफे शॉप हॉटेलमध्ये आली होती. यावेळी बोगस ग्राहकाने चारपैकी एका तरुणीची निवड करुन तिच्याकडे दहा हजार रुपये दिले होते. याच दरम्यान पोलिसांनी तिथे कारवाई करुन प्रियांकासह इतर चार बळीत तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तरुणींच्या चौकशीत प्रियांका ही सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन त्या सर्व शरीर संबंधासाठी ग्राहकांसोबत जात असल्याची कबुली दिली. याकामी त्यांना ग्राहकांकडून देण्यात आलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम मिळत होती तर उर्वरित रक्कम प्रियांका ही स्वतकडे ठेवत असल्याचे सांगितले. या कबुलीनंतर प्रियांकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली.

दुसर्‍या कारवाईत बांगुरनगर पोलिसांनी कनिका नावाच्या एका ६२ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह दलाल नरेशकुमार बेचेन दांगी या दोघांना अटक केली तर तीन तरुणींची सुटका केली. कनिका ही गोरेगाव परिसरात राहत असून ती तिच्या राहत्या घरी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच तिच्यासह तिला मदत करणार्‍या नरेशकुमार या दोघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी तिच्या घरी आलेल्या तिन्ही बळीत तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्या तिघीही मूळच्या कोलकात्याच्या रहिवाशी असून कनिकासाठी काम करत असल्याचे सांगितले. कनिका ही प्रत्येक ग्राहकाकडून शरीर संबंधासाठी पाच हजार रुपये घेत होती. त्यापैकी अर्धी रक्कम ती स्वतकडे तर अर्धी रक्कम ग्राहकांसोबत शरीर संबंधासाठी जाणार्‍या तरुणीला देत असल्याचे उघडकीस आले आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी कॅशसहीत मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले आहेत. कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या सातही तरुणींसह महिलांची मेडीकल करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page