फ्लॅटचा मुख्य लॉक तोडून चोरट्यांची हातसफाई
माटुंगा येथील घटना; दहा लाखांचा मुद्देमाल पळविला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये हातसफाई केल्याची घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे. कपाटातील सुमारे दहा लाखांची कॅश आणि हिरेजडीत सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पलायन केले. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार आकाश निलेश शहा हे त्यांच्या पत्नीसोबत माटुंगा येथील जैन मंदिराजवळील छेडा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक चौदामध्ये राहतात. हर्ष गु्रप डेव्हलपर्स या कंपनीत ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. त्यांचे आई-वडिल सुरत येथे राहत असून त्यांच्या वडिलांचा हिर्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात. त्यांची मोलकरीण सायंकाळी घरातील साफसफाई करुन तिच्या घरी निघून जाते. सोमवारी आकाश हे त्यांच्या पत्नीसोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. सायंकाळी त्यांची मोलकरीण साफसफाईसाठी घरी आली होती. यावेळी तिला फ्लॅटचा मुख्य लॉक तुटलेला दिसला. तिने आत जाऊन पाहणी केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाट उघडे होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती आकाश शहा यांना दिली. घरी चोरी झाल्याचे समजताच ते त्यांच्या पत्नीसोबत घरी आले होते. संपूर्ण कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांना सुमारे दहा लाखांचा मुद्देामल चोरट्याने पळवून नेल्याचे दिसून आले. त्यात हिरेजडीत सोन्याचे दागिने, दहा हजाराची कॅश आदींचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी ही माहिती माटुंगा पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.