फॉरेक्स मार्केटिंग गुंतवणुकीच्या माध्यमातून महिलेची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या २२ वर्षांच्या सायबर ठगाला सातारा येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – फॉरेक्स मार्केटिंगमध्ये चांगला परवाता देतो असे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त करुन एका ४६ वर्षांच्या महिलेची २ लाख ८७ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आकाश महेंद्र पवार या २२ वर्षांच्या सायबर ठगाला दहिसर पोलिसांच्या सायबर सेलच्या विशेष पथकाने सातारा येथून अटक केली. बारावी पास असलेल्या आकाशने स्वतचे एक यूट्यूब चॅनेल सुरु होते, या चॅनेलच्या माध्यमातून त्याने ही फसवणुक केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांनी सांगितले.
मिनाक्षी सचिन साळुंखे ही महिला दहिसर येथे राहते. तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला असून ती गृहिणी आहे. नोव्हेंबर २०२२ रोजी मोबाईलवर युट्यूब पाहत असताना तिला आयएक्स ग्लोबल फॉरेक्स मार्केटिंगबाबतचा एक व्हिडीओ दिसला होता. तिच्याकडे काहीच काम नसल्याने तिने फॉरेक्स मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने लिंकवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्याचे नाव आकाश पवार असल्याचे सांगितले. त्याने तिला ग्लोबल मार्केट गुंतवणुकीची माहिती देत त्यात गुंतवणुक केल्यास तिला दरमाह २५ ते ३० हजार रुपये परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने फॉरेक्स मार्केटिंगमध्ये १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २ लाख ८७ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर तिने तीन महिन्यांनी आकाशला पुन्हा संपर्क साधून गुंतवणुकीसंदर्भात विचारणा केली होती. मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून त्याने तिची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने दहिसर पोलीस ठाण्यात आकाशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राणी पुरी, जितेंद्र कांबळे, सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे, नितीन चव्हाण यांनी तपासाला सुरुवात केली होती. आरोपीचा शोध सुरु असताना आकाश हा सातरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एपीआय अंकुश दांडगे यांच्यासह त्यांच्या पथकाने सातारा येथून आकाशला अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.
तपासात आकाशचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्याने स्वतचे एक यूट्यूब चॅनेल सुरु केले होते. या चॅनेलच्या माध्यमातून त्याने अनेकांना ग्लोबल फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याना चांगला परवाता देतो असे सांगून ही फसवणुक केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
३१ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल होताच अवघ्या आठ दिवसांत कुठलाही पुरावा नसताना आकाश पवार या आरोपीला सातारा येथून अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राणी पुरी, जितेंद्र कांबळे, सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे, नितीन चव्हाण यांचे परिमंडळ बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कौतुक केले.