तोतया सरकारी वकिल श्वेता बडगुजरविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद
कस्टमने जप्त केलेले घड्याळ, गोल्ड कॉईन व फ्लॅटच्या नावाने फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२४
मुंबई, मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकिल तसेच भाऊ कस्टममध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्या श्वेता अनिल बडगुजर ऊर्फ कविता दिपक देसाई ऊर्फ स्मिता दिपक देसाई या महिलेविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची दादर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ७१ वर्षांच्या एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या नातेवाईकांना कस्टमने जप्त केलेले गोल्ड कॉईन, महागडे घड्याळ तसेच तिच्या मुलीला दादर रेल्वे स्थानकाजवळील एका पॉश अपार्टमेंटमध्ये फ्लॅट देण्याच्या आमिषाने श्वेता बडगुजरने एक कोटी सात लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांतील श्वेता ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दहाहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिंबा मनोज नायक ही वयोवृद्ध तक्रारदार महिला प्रभादेवी तिचा मुलगा, सून आणि नातूसोबत येथे राहते. तिने दादर येथील आयएचएम कॉलेजमधून बेकरी ऍण्ड कन्फेक्शनरी हा मॅनेजमेंट कोर्स केला असून विविध ठिकाणी शेफ म्हणून काम केले होते. सध्या तिचा स्वतचा बेकरी फुड विक्रीचा व्यवसाय आहे. ती विविध हॉटेलमध्ये केक आणि बेकरी फुड पुरविण्याचे काम करते. जुलै २०२१ साली दादर येथे ५० वर्षांच्या वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी मिस्टर आणि मिसेस फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये ती गेली होती. तिथेच तिची श्वेता बडगुजर हिच्याशी एक स्पर्धेक म्हणून ओळख झाली होती. शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला नंतर दादर येथे एका पार्टीसाठी एकत्र जमले होते. त्या पार्टीत श्वेता देखील आली होती. याच दरम्यान तिची तिच्याशी चांगली मैत्री झाली होती. पार्टीनंतर तिने बिंबा नायक यांना तिच्याच कारमधून घरी सोडले होते. चर्चेदरम्यान श्वेताने ती सारकारी वकिल असून तिची दुबईत चांगली ओळख आहे. तिने तिला दुबईत शेफसाठी विशेष क्लासेस सुरु करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
ऑक्टोंबर २०२१ ती तिच्या घरी आली होती. यावेळी बिंबासोबत तिचा मुलगा आणि सून होत्या. त्यांना तिने ती मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकिल म्हणून काम करते तर तिचा भाऊ पियुष प्रधान हा मुंबई कस्टममध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. त्यांचे दुबईतील अनेक व्यावसायिकांशी चांगले संबंध आहे. पियुष हा बर्याच वर्षांपासून कस्टममध्ये कामाला असल्याने त्याने अनेक कारवायामध्ये तस्करीमार्गे आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले आहे. जप्त केलेले गोल्ड कॉईन विकत घेऊन त्याने अनेकांना ते कॉईन स्वस्तात दिले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दोघेही स्वस्तात गोल्ड कॉईन देण्याचा व्यवसाय करत असून त्यातून त्यांना चांगला फायदा झाला आहे. यावेळी तिने तिला स्वस्तात सोने देण्याचे आश्वासन दिले होते. बाजरात दहा ग्रॅमला ५२ हजार रुपये किंमत आहे, मात्र दहा ग्रॅमचे तेच गोल्ड कॉईन तिला ४७ हजारामध्ये देण्याचे आमिष दाखविले होते. काही दिवसांनी श्वेताने तिला फोन करुन गोल्ड कॉईन व्यवसायात गुंतवणुकीची ऑफर दिली होती.
श्वेता ही सरकारी वकिल आणि तिचा भाऊ पियुष हा कस्टमचा वरिष्ठ अधिकारी असल्याने तिनेही तिच्यासोबत गोल्ड कॉईन व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान तिने तिला कॉईनसाठी पैसे दिले होते. तिनेही दुसर्या दिवशी तिला सोन्याचे कॉईन देऊन तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती नंतर तिने तिचा मामेभाऊ निकोलाइ किर्तीकर, मामेबहिण राखी पांचाळ, भाचा नितेश रणजीत आणि मुलगा हिरेनची सासू सोनाली सोनाळकर हिला सांगितली. दहा ग्रॅम सोन्याच्या कॉईनमध्ये पाच हजार रुपये फायदा होत असल्याने त्यांनी श्वेताच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने श्वेताला तिचे काही नातेवाईक व्यवसायात गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. या सर्वांची भेट घेण्यासाठी श्वेताने तिच्याच घरी एक मिटींग आयोजित केली होती. ठरल्याप्रमाणे मिटींगमध्ये सर्वजण उपस्थित होते. श्वेतावर विश्वास ठेवून त्यांनी व्यवसायात गुंतवणुकीस तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्च २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत सुमारे ७६ लाख ३५ हजार रुपये घेतले होते.
बिंबाची मुलगी रुखय्या हबीब ही अमेरिकेत राहत असून श्वेताने तिलाही व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मात्र तिने व्यवसायात रुची दाखविली नाही. त्यामुळे श्वेताने तिला दादर रेल्वे स्थानकाजवळील भवानी शंकर रोड, ब्लिस कासा अपार्टमेंटमध्ये २१ व्या मजल्यावर तिच्या नातेवाईकाचा एक फ्लॅट आहे. तो फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. या फ्लॅटमध्ये गुंतवणुक केल्यास भविष्यात तिला चांगला फायदा होईल असे सांगितले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून तिने फ्लॅटचे फोटोसह व्हिडीओ पाठवून दिले होते. श्वेतावर विश्वास ठेवून तिने तिच्या बँक खात्यात सोळा लाख तर कॅश स्वरुपात ५२ लाख रुपये दिले होते. अशा प्रकारे तिने फ्लॅटसाठी तिला ६८ लाख रुपये दिले होते. मात्र तिने फ्लॅटचे कागदपत्रे दिले नाही, फ्लॅटचा करार केला नाही. याच दरम्यान श्वेताने तिला कस्टमने जप्त केलेले डिटोना, रोलॅक्स आणि सी मास्टर कंपनीचे महागडे घड्याळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे असून त्याचे फोटो पाठविले होते. एका घड्याळाची किंमत २८ लाख रुपये असून ते घड्याळ तिला पंधरा लाखांमध्ये देते असे सांगितले होते. त्यामुळे तिने चारही घड्याळासाठी तिला पंधरा लाख रुपये दिले होते. मात्र तिने तिला घड्याळ दिले नाही. त्यामुळे तिने श्वेतासह तिचा भाऊ पियुषची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पियुष प्रधान नावाचा कोणीही व्यक्ती कस्टममध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला नसल्याचे तिला समजले होते. दादरच्या फ्लॅटशी तिच्यासह तिच्या नातेवाईकांचा काहीही संबंध नव्हता. तरीही तिने फ्लॅटसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. गोल्ड कॉईनसाठी घेतलेल्या पैशांचाही तिने अपहार करुन तिच्यासह तिच्या नातेवाईकांची फसवणुक केली होती.
चौकशीदरम्यान श्वेताने अशाच प्रकारे अनेक व्यक्तींना विविध आमिष दाखवून गंडा घातला आहे. तिच्याविरुद्ध लग्नाआधी आणि लग्नानंतर वांद्रे, पोलीस ठाण्यात तीन, मुलुंड, वाकोला, कांदिवली, ओशिवरा, डी. एन नगर, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा नऊ अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बिंबा नायक यांच्याकडून तिने गोल्ड कॉईनसाठी ७६ लाख ३५ हजार, दादरच्या फ्लॅटसाठी ६८ लाख आणि कस्टमने जप्त केलेले घड्याळ स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपये असे १ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये घेतले होते. त्यापैकी काही रक्क्कम तिने परत केले. मात्र एक कोटी सात लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच बिंबा नायक यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्वेताविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. हा तिच्याविरुद्ध दाखल झालेला दहावा गुन्हा आहे. तिच्या अटकेनंतर फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.