पत्नीने बेदम मारहाण केल्याने ५० वर्षांच्या पतीचा मृत्यू
दारु पिण्यावरुन झालेल्या भांडणातून घडलेला प्रकार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – पत्नीने बेदम मारहाण केल्यामुळे एका ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव धनजी केशव मकवाना असून त्याच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी जया धनजी मकवाना हिला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारु पिण्यावरुन झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा एक ते पहाटे सकाळी साडेसात वाजता चेंबूरच्या माहुल म्हाडा वसाहत, इमारत क्रमांक चारमधील फ्लॅट क्रमांक २२३ मध्ये घडली. उषा अर्जुन लखुम ही महिला कॉटनग्रीन परिसरात राहते. तिचा धनजी हा सख्खा भाऊ असून तो गेल्या चार वर्षांपासून त्याची पत्नी जया आणि दोन मुलांसोबत चेंबूर येथील माहुल म्हाडा वसाहतीत राहतो. महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणार्या धनजीचे सतरा वर्षांपूर्वी जयासोबत लग्न झाले होते. जयाच्या भांडखोर स्वभावामुळे त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यातच धनजीला दारु पिण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांनी इतर भावडांसोबत कौटुंबिक संबंध तोडून टाकले होते. तरीही धनजी हा उषाला भेटण्यासाठी अधूनमधून कॉटनग्रीन येथे येत होता. यावेळी तो जया ही त्याच्याशी सतत भांडण करत असून मद्यप्राशन करुन घरी गेल्यानंतर त्याला मारहाण करत असल्याचे सांगायचा. त्यामुळे उषाने त्याला दारु सोडून देण्याचा सल्ला दिला होता.
शुक्रवारी उषाला तिचा चुलत भाऊ सुरेश मकवाना याने फोन करुन धनजीचे निधन झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिच्यासह तिचे नातेवाईक चेंबूर येथे गेले होते. तिथे गेल्यानंतर धनजी आणि जया यांच्यात रात्री उशिरा भांडण झाले होते. त्यानंतर त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या मृत्यूबाबत उषाने संशय व्यक्त करुन आरसीएफ पोलिसांना तपास करण्याची विनंती केली होती. त्यात शवविच्छेदन अहवालात धनजीचा मृत्यू दोन्ही बाजूच्या बरगड्या आणि बरगड्याच्या खाली पोटावर जबर मारहाण झाल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले होते. तपासात शुक्रवारी रात्री धनजी आणि जया यांच्यात दारु पिण्यावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर तिने धनजीला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उषाने जयाने केलेल्या मारहाणीत धनजीचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जयाविरुद्ध ३०४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.