चार वर्षांच्या मुलीच्या लैगिंक अत्याचारप्रकरणी आरोपीला कारावास
विशेष पोक्सो न्यायालयाकडून २० वर्षांच्या कारावासासह अकरा हजाराचा दंडाची शिक्षा
मुंबई, – बोरिवली परिसरात एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या राकेश सानू सहानी याला दिडोंशीच्या विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवून वीस वर्षांच्या कारावासासह अकरा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून राकेश हा न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये असून या शिक्षेमुळे त्याला आणखीन पंधरा वर्ष जेलमध्ये राहावे लागणार आहे. भक्कम पुरावे सादर करुन आरोपीला दोषी होण्यास विशेष परिश्रम घेणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
पिडीत मुलगी चार वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहते. आरोपी हा तिच्या कुटुुंबियांच्या परिचित आहे. फेब्रुवारी २०१९ रोजी त्याने तिला एका शाळेच्या पाठीमागील परिसरात नेले आणि तिथेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिल्यानंतर त्याने तिला सोडून दिले होते. घरी आल्यांनतर ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तिच्या आईने विचारपूस केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिने बोरिवली पोलीस ठाण्यात राकेश सहानीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (अ), (ब), ५०६ भादवी सहकलम ४, ६, ८, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल घोसाळकर, महिला पोलीस उपनिरीक्षक दिप्ती शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत या पथकाने पळून गेलेल्या आरोपीस अटक करुन त्याला पोक्सो न्यायालयात हजर केले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.
गेल्या पाच वर्षांपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. त्याला जामिन मिळू नये यासाठी पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले होते. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्या. टाकळीकर यांच्या न्यायालय क्रमांक १२ मध्ये आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची तिथे नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी न्या. टाकळीकर यांनी आरोपी राकेश सहानीला भादवीसह पोक्सोच्या सर्वच कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला वीस वर्षांच्या कारावास आणि अकरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारी वकिल म्हणून मालनकर मॅडम यांनी काम पाहिले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माने, कोर्ट कारकून पोलीस हवालदार अनंत चित्ते, महिला पोलीस शिपाई कदम, कार्यालयातील कामकाज पोलीस हवालदार हरिश राणे, सावर्डेकर, समन्स वॉरंटरचे काम पोलीस हवालदार कोंडविलकर, निजाई यांनी विशेष परिश्रम घेतले होते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी पोक्सो न्यायालयात त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले होते. त्यामुळे त्याला पाच वर्षांनी वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.