२९ कोटीच्या सोन्यांचा अपहारप्रकरणी तिघांना अटक
शेअरमध्ये गुंतवणुक करुन नुकसान झाल्याचे तपासात उघड
राजू परुळेकर
३१ जुलै २०२४
मुंबई, – कंपनीच्या डोबिवली शाखेतून जानेवारी ते एप्रिल महिन्यांत सुमारे २१ कोटीचे २९ किलो सोने असलेले २६० पॅकेट चोरी करुन चोरी केलेल्या दागिन्यांवर कर्ज काढून कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या प्रॉपटी सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात कंपनीच्या डोबिवली शाखेचा मॅनेजर शिवाजी भास्कर पाटील, विभागीय प्रमुख शिवकुमार रामास्वामी अय्यर आणि ज्वेलर्स व्यापारी सचिन भीमराव साळुंखे यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने मंगळवार ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील शिवकुमारने बँकेतून कर्ज तारण ठेवून मिळालेल्या पैशांतून शेअरमध्ये गुंतवणुक केली, त्यात त्याला नुकसान झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार आकाश पचलोड हे अंधेरीतील एका खाजगी कंपनीत बिझनेस प्रमुख म्हणून काम करतात. या कंपनीने एप्रिल २०२४ रोजी एका खाजगी कंपनीच्या गोल्ड विभाग विकत घेतले होते. या कंपनीचे डोबिवली, कल्याण, कळंबोली, टिटवाळा परिसरात पाच शाखा आहेत. यातील डोबिवली शाखेत शिवाजी पाटील हा शाखा मॅनेजर तर शिवकुमार अय्यर हा विभागीय प्रमुख म्हणून कामाला होता. कंपनीचा ताबा घेतल्यानंतर तिथे ठेवण्यात आलेल्या दागिन्यांचे ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटदरम्यान जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत डोबिवली शाखेतून सोन्याचे २६० हून अधिक पॅकेट गहाळ असल्याचे दिसून आले. त्यात २१ कोटीचे २९ किलो सोने होते. ही माहिती कंपनीला देण्यात आली होती. या संपूर्ण घटनेची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत शिवाजी पाटील आणि शिवकुमार अय्यर यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांना कंपनीकडून नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांनी सोन्याची चोरी केल्याची कबुली देताना सर्व सोने परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी ते सोने परत केले नाही. त्यामुळे कंपनीच्या वतीने आकाश पचलोड यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित कर्मचार्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर प्रॉपटी सेलकडे वर्ग करण्यात आला होता.
हा तपास हाती घेताना सोमवारी शिवाजी पाटील, शिवकुमार अय्यर आणि त्याचा ज्वेलर्स व्यापारी मित्र सचिन साळुंखे या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत शिवकुमार हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले. त्यानेच शिवाजी पाटीलसोबत संगनमत करुन कंपनीच्या डोबिवली शाखेतून जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत सुमारे २१ कोटीचे २६० सोन्याचे पॅकेट चोरी केले होते. ते सोने त्याने सचिनच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने बँकेत तारण ठेवून गोल्ड लोन घेतले होते. त्यातून ८ कोटी ७५ लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी ४० लाख रुपये त्याने शिवाजी पाटील दिले होते. याच पैशांतून शिवकुमारने शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती. मात्र त्याला शेअर गुंतवणुकीवर प्रचंड नुकसान झाले होते. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने तिघांनाही ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले सोने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.