दिड कोटीचा कर बुडविणार्‍या व्यावसायिकाला अटक

गुन्हा दाखल होताच आठ महिन्यांपासून वॉण्टेड होता

0

अरुण सावरटकर
४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सुमारे दिड कोटीचा अपहार करुन राज्य शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी वॉणटेड असलेल्या एका व्यावसायिकाला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. सुनिल मल्हारराव पांड्ये असे या व्यावसायिकाचे नाव असून तो मेसर्च मल्हार शांती इंटरप्रायजेस या कंपनीचा मालक आहे. गुन्हा दाखल होताच सुनिल हा गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सचिन शिवाजी चिखले हे नवी मुंबईतील खारघर परिसरात राहत असून सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून काम करतात. काही खाजगी कंपन्यांकडून शासनाचा कर बुडविला जात असल्याने अशा कंपन्यांविरुद्ध संबंधित विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गोरेगाव येथील संतोष नगर परिसरात मेसर्च मल्हार शांती इंटरप्रायजेस नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविल्याची माहिती माझगाव येथील विक्रीकर कार्यालयाला प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर सचिन चिखले यांना वरिष्ठांकडून तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान सुनिल पांड्ये हा कंपनीचा मालक असून ही कंपनी बांधकाम व्यवसायात वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि साहित्य आदींचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले होते. मालाची विक्री केल्यानंतर त्यावर घेतलेला कर विक्रीकर विभागात भरणे बंधनकारक होते. मात्र त्यांनी कराची ही रक्कम भरता शासनाची फसवणुक केली होती.

चौकशीत कंपनीकडून शासनाला १ कोटी ४७ लाख ५६ हजार ४८६ रुपयांचा कर येणे अपेक्षित होते. मात्र वारंवार नोटीस बजावून कंपनीकडून कराची रक्कम भरण्यात आली नव्हती. कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीचे सर्व बँक खाती गोठविण्यात आले होते. याच दरम्यान सचिन चिखले हे त्यांच्या सहकार्‍यासोबत संबंधित कंपनीत गेले होते, मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना सुनिल पांड्ये सापडले नाही. ते कार्यालयात येत नसल्याचे दिसून आले होते. सुनिलचे कार्यालय अरुण दत्तात्रय कुडाळकर यांच्या मालकीचे  होती. ती जागा त्याने भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यामुळे सुनिल पांडये याला कारणे नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र या नोटीसला त्याने काहीच उत्तर दिले नव्हते. त्याने शासनाच्या सुमारे दिड कोटीच्या कराचा अपहार करुन फसवणुक केला होता. त्यामुळे विक्रीकर कार्यालयाच्या वतीने सचिन चिखले यांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात मेसर्च मल्हार शांती इंटरप्रायजेसचे मालक सुनिल पांड्ये याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सुनिल हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला गेल्या आठवड्यात दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page