मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत एका ४८ वर्षांच्या आरोपीला ताडदेव पोलिसांनी अटक केली. आरोपी स्वतच्याच सतरा वर्षांच्या मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून लैगिंक अत्याचार करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. अटकेनतर आरोपी पित्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून सध्या महालक्ष्मी येथे तिच्या पालकांसोबत राहते. १२ वर्षांची असताना ती तिच्या वडिलांसोबत तिच्या उत्तरप्रदेशातील गावी राहत होती. यावेळी त्याने स्वतच्या मुलीवर झोपत असताना लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गावासह मुंबईत वास्तव्यास असताना तो तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून लैगिंक अत्याचार करत होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकीच त्याने तिला दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. पित्याकडून सतत असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून ती घरातून पळून गेली होती. हा प्रकार तिच्या पित्याला समजताच त्याने ताडदेव पोलीस ठाण्यात तिच्या मुलीची मिसिंग तक्रार केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा ताडदेव पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकारी संमातर तपास करत होते.
हा तपास सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, पोलीस उपनिरीक्षक राणे, गोरेगावकर, पोलीस हवालदार घाटकर, परब, जगताप, पोलीस शिपाई चव्हाण, महिला पोलीस शिपाई ठाकूर, हर्षला पाटील यांना ही मुलगी महालक्ष्मी रेल्वे स्थानकात सापडली. तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने तिचे पिता गेल्या पाच वर्षांपासून तिच्यावर लैगिंक अत्याचार करत असल्याचे सांगितले. त्यांच्या अत्याचाराला कंटाळूनच ती घरातून पळून गेल्याचे सांगितले. तपासात ही माहिती येताच तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या पथकाने महालक्ष्मी, सातरस्ता परिसरातून आरोपी पित्याला अटक करुन त्याला पुढील चौकशीसाठी ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन केले. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.