फसवणुकीप्रकरणी आदित्य बिर्ला कंपनीच्या मॅनेजरला अटक

बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून ५.१९ कोटीचा अपहाराचा आरोप

0

अरुण सावरटकर
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – स्वतच्या अधिकार्‍याचा गैरवापर करुन कंपनीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या माजी अकाऊंट पेयबल मॅनेजरला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. सागर बळीराम भोजणे असे या मॅनेजरचे नाव असून त्याने बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून कंपनीच्या ५ कोटी १९ लाखांचा अपहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुदर्शन कृष्णनाथ कापसे हे नवी मुर्ंबतील कळंबोलीचे रहिवाशी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते गोरेगाव येथील आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. ही कंपनी गरजू व्यक्तींना घरासाठी कर्ज उपलब्ध करुन देते. ज्या व्यक्तींना कंपनीचे गृहकर्ज दिले आहे, त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीतर त्यांच्यावर कोर्टात केस फाईल करणे, त्याचा पाठपुरावा करणे, फ्लॅटचा ताबा देणे अशा प्रकारच्या कामाची जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या टिमवर आहे. याच कंपनीत सागर भोजणे हा अकाऊंट पेयबल मॅनेजर म्हणून कामाला होता. त्यांच्या कंपनीत येणार्‍या विविध प्रकारच्या बिले तपासण्याचे काम अकाऊंट विभागाकडून होते. ही रक्कम अकाऊंट विभागाकडून मंजूर झाल्यानंतर सायबमन ब्रिटो हा अधिकारी त्याची अकाऊंटींग सिस्टीममध्ये त्याची नोंद करतो. ही सर्व माहिती तपासणे आणि पैसे पाठविण्याची जबाबदारी सागर भोजणे याच्यावर होती. मात्र त्याने कामादरम्यान स्वतच्या पदाचा गैरवापर करुन सागर ऍण्ड सागर असोशिएट्स आणि ओम असोशिएट्स या नावाने बोगस अकाऊंट बनविली होती. त्यात बोगस बिलांची नोंद करुन त्याने स्वतच्या बँक खात्यात कंपनीचे पैसे ट्रान्स्फर केले होते.

डिसेंबर २०२३ रोजी कंपनीला आयकर विभागाकडून एक नोटीस प्राप्त झाली होती. त्यात एका पॅनकार्डचा उल्लेख करुन कंपनीने विविध प्रकारच्या बिलांचे पैसे संंबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केले आहेत. या पॅनकार्डधारकाची रिटर्न फाईल्सची कुठेही नोंद नाही किंवा त्याने कोणत्याही प्रकारे क्लेम केलेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नोटीसमुळे कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेत त्याची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात सागर भोजले याच्या नावाने संबंधित पॅनकार्ड जारी करण्यात आले होते. त्याने बोगस कंपनी स्थापन करुन कंपनीचे बँकेत खाती उघडले होते. याच बँक खात्यात २८ नोव्हेंबर २०१८ ते १३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५ कोटी ४२ लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच सागर भोजणे याला कामावरुन निलंबित करण्यात आले होते. डिसेंबर २०२३ साली त्याने कंपनीत २३ लाख रुपये जमा केले, मात्र उर्वरित ५ कोटी १९ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने सुदर्शन कापसे यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर मार्च २०२४ साली सागर भोजणेविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०८, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला सहा महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहार केलेल्या पैशांबाबत त्याची चौकशी सुरु असून ही रक्कम त्याच्याकडून लवकरच जप्त केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page