७२ लाखांच्या फॉरेक्स ट्रेडिंग फसवणुकप्रकरणी आरोपीस अटक
आरोपीच्या मुलासह दोघांचा शोध; तिघेही मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी
अरुण सावरटकर
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने बोरिवलीतील एका जोडप्याची सुमारे ७२ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीस कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. देशभूषण बळवंत देशमाने असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत देशभूषणचा मुलगा प्रितम देशभुषण देशमाने आणि राजेंद्र भीमराव नेर्लीकर या दोघांचा पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तिन्ही आरोपी मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने मुंबईसह कोल्हापूर शहरात अनेकांची फसवणुक केली असून फसवणुकीचा हा आकडा पाच कोटीपेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे.
३८ वर्षांची तक्रारदार महिला मीनल धनपाल सेठ ही बोरिवलीतील गेही भवन, दौलतनगरची रहिवाशी असून तिचे पती दिपककुमार जैन हे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. २०२१ साली ती तिच्या पतीसोबत कर्नाटकच्या हुबली येथील जैन मंदिरात गेली होती. तिथेच त्यांची ओळख जैन मुनी नमित सागरजी महाराज यांच्याशी झाली होती. त्यांनी अनेकदा त्यांना कौटुंबिक जीवनाबाबत चांगले मार्गदर्शन केले होते. त्यामुळे ते नियमित जैन मंदिरात दर्शनासाठी जात होते. दोन वर्षांपूर्वी महाराजांनी त्यांची ओळख देशभूषण व त्यांचा मुलगा प्रितम, राजेंद्रशी करुन दिली होती. ते तिघेही कोल्हापूरचे रहिवाशी असून ते महाराजांचे भक्त आहेत. या ओळखीत त्यांनी ते बडे गुंतवणुकदार असून त्यांचा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसाात अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यातून त्यांनी त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या शेअरसह फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत टप्याटप्याने त्यांच्याकडे ७२ लाख ५० हजाराची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीनंतर त्यांनी त्यांना १३ लाख ३२ हजार रुपये परतावा दिला होता. मात्र नंतर त्यांनी पैसे देणे बंद केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांनी मुद्दलसह परताव्याची रक्कम देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यांना पैसे परत केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल घेणे बंद केले होते. त्यामुळे मीनल सेठ व तिचे पती धनपाल सेठ हे कोल्हापूरच्या त्यांच्या गावी गेले होते. यावेळी त्यांना या तिघांनी त्यांच्यासह इतर काही गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून फसवणुक केल्याचे समजले होते. फसवणुकीची ही रक्कम सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक असल्याचा त्यांचा संशय आहे. या तिघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच मिनल सेठ यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जानेवारी २०२४ रोजी देशभूषण, त्यांचा मुलगा प्रितम आणि मित्र राजेंद्र यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या नऊ महिन्यांपासून वॉण्टेड असलेला या कटातील मुख्य आरोपी देशभूषण देशमाने याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत या टोळीने फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याचा मुलगा प्रितम आणि मित्र राजेंद्र फरार असल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहेत.