लैगिंक अत्याचारानंतर ब्लॅकमेल करुन डॉक्टर महिलेची फसवणुक
अनैतिक संबंध उघड करुन बदनामीची धमकी देऊन एक कोटीची वसुली
अरुण सावरटकर
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विवाहीत असताना एका ४० वर्षांच्या डॉक्टर महिलेला लग्नाची मागणी घालून तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार करुन अनैतिक संबंधाची मित्रमंडळीसह नातेवाईकांना माहिती सांगून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याच प्रियकराने तिची सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरुन अवैझ ताझिम अहमद या ३३ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीसह लैगिंक अत्याचार, मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप आरोपी प्रियकरावर अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० वर्षांची तक्रारदार महिला ही डॉक्टर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहते. जुलै २०२२ रोजी तिची फेसबुकवर अवैझ अहमद याच्याशी ओळख झाली होती. चॅटदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती तिच्या मुलीसोबत राहत असल्याने त्याने तिला तिच्या मुलीसोबत स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्याच्याशी संभाषण करताना तिला त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे तिनेही त्याला लग्नासाठी होकार दिला होता. याच दरम्यान ते दोघेही अंधेरीतील एअरपोर्ट रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटत होते. या भेटीदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. सुरुवातीला तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, मात्र तो तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत होता. काही महिने सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र काही दिवसांनी तो विविध कारण सांगून तिच्याकडून पैशांची मागणी करत होता. सुरुवातीला तिनेही त्याला पैसे दिले होते. मात्र नंतर तिने पैसे देण्यास नकार देताच तो तिला धमकी देऊ लागला. पैसे दिले नाहीतर त्यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती तिच्या मित्रमंडळीसह नातेवाईकांना सांगून तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता.
ही धमकी देऊन त्याने तिच्याकडून जुलै २०२२ ते मे २०२४ या कालावधीत टप्याटप्याने एक कोटी दोन लाख रुपये तसेच ३५ तोळे सोन्याचे दागिने घेतले होते. ही रक्कम देऊनही तो तिला सतत ब्लॅकमेल करुन तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैशांवरुन होणार्या वादानंतर त्याने तिला अनेकदा मारहाण केली होती. याच दरम्यान तिला अवैझ अहमद हा विवाहीत असून त्याने तो विवाहीत असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते. विवाहीत असताना त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करुन तिला लग्नासाठी प्रपोज केले. तिच्यावर त्याने अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर तिची बदनामीची धमकी देऊन त्याने तिच्याकडून एक कोटी दोन लाख रुपये उकाळले होते. या प्रकारानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिच्या काही परिचित लोकांशी चर्चा करुन अवैध अहमदविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
अलीकडेच तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तक्रार अर्जाद्वारे त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिची पोलिसांनी जबानी नोंदवून आरोपी प्रियकर अवैझ अहमदविरुद्ध ३२३, ३७६, ३७६ (२), (एन), ४२०, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून अवैझची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अवैझ हा मालाडच्या कुरार व्हिलेज, त्रिवेणीनगर, निलम अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.