बिझनेस वाढविण्यासाठी कमिशनचा प्रस्ताव ठेवून बोगस कंपन्या उघडल्या

पावणेआठ कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – बिझनेस वाढविण्यासाठी पार्टी कंपनीला कमिशन देण्याचा प्रस्ताव ठेवून कंपनीच्या बिझनेस हेड अधिकार्‍याने स्वतसह पत्नी, सासू, सासरे आणि मैत्रिणीच्या नावाने बोगस कंपन्या उघडून बोगस बिल आणि इन्वाईस सादर करुन कंपनीकडून कमिशनपोटी घेतलेल्या सुमारे पावणेआठ कोटीचा अपहार केला, याप्रकरणी भादवी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या मुख्य आरोपीस दोन महिन्यानंतर डहाणू येथून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रितेश अनुसेलम फर्नाडिस असे या आरोपी असून त्यानेच कट रचून ही गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

पल्लवी मनोहर पाटील ही महिला वरळी येथे राहत असून ती फोर्ट येथील हिंद ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेड या शिपींग कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करते. याच कंपनीत मनिष मधुसुदन क्षीरसागर हे संचालक म्हणून कामाला असून ही कंपनी बोटी भाड्याने देणे, बोटीवर कॅटरिंग आणि हाऊसकिंपिग सेवा देण्याचे काम करते. त्यांच्या कंपनीत २७० हून अधिक कर्मचारी अणि अधिकारी कामाला आहेत. २००८ साली रितेश कंपनीत सल्लागारासह बिझनेस हेड म्हणून कामाला लागला होता. त्याच्यावर कंपनीच्या बोटी भाड्याने देण्यासह कस्टमर आणणे आणि कंपनीचा व्यवसाय वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्याला साडेतीन लाख रुपये वेतन दिले जात होते. याच दरम्यान त्याने मनिष क्षीरसागर यांना क्लाईंट मिळवून देणार्‍या पार्टीला कंपनी कमिशन देत नसल्याने आपल्या स्पर्धेक कंपनीकडे ग्राहक जात आहे. त्यामुळे बिझनेस वाढविण्यासाठी क्लाईंट आणून देणार्‍या पार्टी कंपनीला कमिशन देण्याची विनंती केली होती. त्यातून कंपनीचा प्रचंड बिझनेस वाढेल असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. रितेशवर विश्‍वास ठेवून त्यांनी क्लाईंट आणून देणार्‍या कंपनीला कमिशन देण्यास सुरुवात केली होती. क्लाईंट वाढल्याने त्यांचा व्यवसाय वाढत असल्याने त्यांचा त्याच्यावर विश्‍वास बसला होता.

२०२२ साली कंपनीचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात कंपनीला गेल्या काही महिन्यांत प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान रितेशने कंपनीचा ईमेल आयडीचा वापर करुन कंपनीची गोपनीय माहिती स्पर्धेक कंपनीला दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात २०१७ ते २०२३ या कालावधीत रितेशने कंपनीचा बिझनेस वाढ होईल असे आमिष दाखवून काही कपन्यांना कमिशन द्यावे लागेल असे सांगून त्याची पत्नी हर्षा शहा हिच्या नावाने ओसियेन ब्रीझ मरिन ब्रोकर ऍण्ड कन्सलटंट, सासू तारा शहा हिच्या नावे पॅक्सटॉन कनसलटनसी सर्व्हिसेस, सासरे मनोहरलाल शहा यांच्या नावाने निओ कन्सलटंट आणि मैत्रिण मनिषा सपालिका हिच्या नावाने मरिन सोल्यूशन ब्रोकर ऍण्ड कन्सलटंट आणि स्वत निजओन कन्सलटंट नावाने बोगस कंपन्या सुरु केल्याचे दिसून आले. या कंपन्यांना शिपिंग व्यवसायाचे कोणतेही ज्ञान आणि अनुभव नव्हते. तरीही या कंपन्यांच्या नावाने बोगस बिल सादर करुन कंपनीतून ७ कोटी ७४ लाख ७२ हजाराचे पेमेंट करण्यास आले होते. अशा प्रकारे रितेशने सहा वर्षांत कंपनीच्या पावणेआठ कोटीचा अपहार करुन फसवणुक केली होती.

चौकशीदरम्यान हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने पल्लवी पाटील यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी रितेशसह हर्षा मनोहरलाल शहा, तारा मनोहरलाल शहा, मनोहरलाल प्यारेलाल शहा आणि मनिषा रघुनाथ सपालिंगा या पाचजणांविरुद्ध १२० ब, ४०८, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पळून गेले होते. याच दरम्यान रितेशने अटकपूर्व जामिनासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरु केली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना रितेश हा डहाणू येथील गंजाड, गाव रायतळीकरच्या बॅवेलोन बंगल्यात लपला असून तो तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेषात पाळत ठेवून रितेशला चौकशीसाठी ताब्यात होते. त्याच्या अटकेची माहिती नंतर त्याची आई शालिनी आणि वडिल अनसेलम फर्नाडिस यांना देण्यात आली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page