३४ लाखांच्या पुस्तकाच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक
नाशिकच्या शाळेच्या प्राचार्यासह सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल
राजू परुळेकर
१४ डिसेंबर २०२४
मुंबई, – सुमारे ३४ लाखांच्या शालेय पुस्तकांच्या पैशांचा अपहार करुन चेतना एज्युकेशन लिमिटेड या खाजगी कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार लोअर परेल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र सुदाम साळवे, चित्रा घस्टे आणि संतोष हनुमंत जगताप अशी या तिघांची नावे आहेत. यातील जितेंद्र आणि संतोष कंपनीचे सेल्समन तर चित्रा घस्टे ही नाशिकच्या एका नामांकित शाळेच्या प्राचार्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. जितेंद्रने चित्राच्या मदतीने २६ लाख ४९ हजार ४८७ पुस्तकांची तर संतोषने ८ लाख ८ हजारांच्या पुस्तकांची परस्पर विक्री करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
सायली जीवन मोरे ही तरुणी दादर परिसरात राहत असून लोअर परेल येथील कमला सिटीमधील चेतना एज्युकेशन लिमिटेउ या कंपनीत सेल्स विभागात कामाला आहे. कंपनीच्या सेल्समनवर लक्ष ठेवणे, त्यांनी विक्री केलेल्या मालाचे बिल वसुल करणे आदी कामाची जबाबदारी तिच्यावर आहे. ही कंपनी शालेय शिक्षणासाठी लागणारे पुस्तक तयार करणे, ते पुस्तक संपूर्ण देशातील शाळेत वितरण करण्याचे काम करते. कंपनीने महाराष्ट्रात दोन ते तीन सेल्समनची नियुक्ती केली आहे. त्यातील जितेंद्र साळवे याला नाशिक जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यांतील शाळेतून तसेच पुस्तक विक्रेत्याकडून कंपनीने तयार केलेल्या पुस्तकांची जाहिरात करुन पुस्तकांचे ऑर्डर घेणे आणि विकलेल्या पुस्तकांची रक्कम कॅश, चेक किंवा ऑनलाईन कंपनीत जमा करणे असे स्वरुप होते. जून २०२१ पासून कंपनीने नाशिकच्या वडाळा रोड, जे. एम सिटी कॅम्प्स, जुम्मा मशिद चेरिटेबल ट्रस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेला काही पुस्तकांची विक्री केली होती.
मात्र शाळेकडून त्याचे पेमेंट करण्यात आले होते. शाळेकडून येणार्या पेमेंटबाबत तिने जितेंद्र साळवेकडे सतत विचारणा सुरु केली होती. मात्र त्याच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने संबंधित शाळेला कॉल करुन पेमेंटबाबत विचारणा केली होती. यावेळी शाळेने संपूर्ण पेमेंट जितेंद्रला दिल्याचे सांगितले. याबाबत विचारणा केल्यानंतर जितेंद्रने कंपनीकडून घेतलेल्या काही पुस्तकांची शाळेला विक्री केलीहोती. उर्वरित पुस्तक त्याने शाळेच्या प्राचार्य चित्रा घस्टे हिच्याशी संगनमत करुन खुल्या बाजारात विक्री करुन या पैशांचा अपहार करुन कंपनीची कबुली केल्याची कबुली दिली होती. तसेच शाळेला पेमेंट चेक किंवा ऑनलाईन करणे बंधनकारक असताना चित्रा घस्टे हिने पेमेंट कॅश स्वरुपात जितेंद्रला दिले होते. शाळेला कंपनीचे दहा लाख रुपये देणे बाकी होते, मात्र तिने पेमेंट केल्याचा मेल पाठवून कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरीकडे सप्टेंबर २०१३ पासून कंपनीतील रत्नागिरीसाठी सेल्समन म्हणून नियुक्त केलेल्या संतोष जगताप यानेही अशाच प्रकारे काही पुस्तक विक्रेत्यांना परस्पर पुस्तकांची विक्री करुन कंपनीच्या पैशांचा अपहार केला होता. त्याने काही शाळांना पुस्तकांची विक्री केल्याचे सांगून त्यांचे पेमेंट लवकरच कंपनीत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संबंधित शाळेच्या प्रमुखांना कॉल केल्यानंतर ते पेमेंट संतोषला देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली होती. अशा प्रकारे संतोषने रत्नागिरीच्या सतरा शाळेकडून पेमेंट कॅश स्वरुपात घेऊन कंपनीची फसवणुक केली होती.
जुलै २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत जितेंद्र साळवेने चित्रा घस्टेशी संगमनमत करुन तसेच संतोषने २६ लाख ४९ हजार ४८७ पुस्तकांची परस्पर विक्री केली तर ८ लाख ८ हजार ५८३ रुपयांच्या पुस्तकांच्या बिलाची रक्कम शाळेकडून कॅश स्वरुपात घेऊन एकूण ३४ लाख ५८ हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच सायली मोरे यांनी कंपनीच्या वतीने या तिघांविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र साळवे, संतोष जगताप या दोन सेल्समनसह नाशिकच्या शाळेच्या प्राचार्य चित्रा घस्टे अशा तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.