बँकेतून कर्ज काढून पत्नीची फसवणुक करणार्‍या पतीला अटक

कर्जाच्या पैशांतून बारसह दारुवर पैसे उधळून करुन मौजमजा केली

0

अरुण सावरटकर
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – फोर्ट येथील एका नामांकित बँकेच्या विमा विभागात मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन तीन विविध बँकेतून कर्ज काढून सुमारे ३२ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी पतीला चार महिन्यानंतर काळाचौकी पोलिसांनी अटक केली. रविंद्र त्र्यबंक बुरकुल असे या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत श्रद्धा विजय बाणे आणि विजय सुरेश बाणे हे दोघेजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविंद्रसह विजय बाणेने बँकेतून काढलेल्या कर्जाच्या पैशांतून बारसह दारुवर पैसे उधळून मौजमजा केल्याचे तपासात उघडकीस आले.

सविता रविंद्र बुरकुल ही महिला तिचा पती रविंद्र आणि दोन मुलांसोबत काळाचौकी परिसरात राहत असून एका खाजगी विमा कंपनी मॅनेजर म्हणून कामाला आहे. तिचा पती रविंद्रचे द फॅमिली सलून या नावाने युनिसेक्स सलून आहे. त्यात त्याचा विजय बाणे हा पार्टनर आहे. कोरोना काळात व्यवसाय कमी झाल्याने रविंद्रला त्याच्या कर्मचार्‍याला वेतन तसेच दोन वर्षांचे दुकानाचे भाडे देता आले नव्हते. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्याचा सिव्हिल रेकॉर्ड कमी होता तर रविंद्रचा आधीच गृहकर्ज सुरु होते. त्यामुळे या दोघांना कुठल्याही बँकेतून कर्ज मिळणार नव्हते. त्यातच थकीत भाडे दिले नाहीतर त्याला दुकान खाली करावे लागणार होते. त्याची पत्नी एका नामांकित विमा कंपनीत मॅनेजर म्हणून कामावर असल्याने रविंद्रसह विजयने तिच्या नावाने वैयक्तिक कर्ज घेण्याची योजना बनविली होती. त्यामुळे या दोघांनी सविताची भेट घेऊन तिला याबाबतची माहिती दिली आणि नुकसान भरुन काढण्यासह कर्मचार्‍याचे वेतन देण्यासाठी दहा लाखांची गरज आहे असे सांगितले. वैयक्तिक कर्जासाठी तिला मदत करण्याची विनंती केली होती.

या दोघांवर विश्‍वास ठेवून तिने त्यांच्यासाठी वैयक्तिक कर्ज काढण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी रविंद्रने लवकरात लवकर कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे तिने तिचे वैयक्तिक कागदपत्रे रविंद्रला दिले होते. या कागदपत्रांवरुन रविंद्र आणि विजय यांनी एकाच वेळेस तीन ते चार बँकेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला होता. त्यामुळे बँकेने कर्जाची प्रोसेसिंग सुरु केली होती. दहा लाखांच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन या तिघांनी तीन बँकेतून ३२ लाख ५० हजार रुपयांसाठी अर्ज केला होता. बँकेतून कर्ज मंजूर झाल्याचा मेल प्राप्त होताच सविताला धक्काच बसला होता. तिने तिचा पती रविंद्रकडे विचारणा केली असता त्याने तिला थातूरमातूर कारण सांगून तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने तिला पुन्हा तिन्ही बँकेचे नियमित हप्ते भरण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

कर्जाची रक्कम बँकेत जमा होताच तिने रविंद्र, विजय यांच्या कंपनीसह विजयची पत्नी श्रद्धा बाणे हिच्या सिद्धीविनायक इंटरप्रायजेस कंपनीच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. ऑक्टोंबर २०२२ पासून कर्जाचे नियमित हप्ते सुरु झाले होते. सहा महिने त्यांनी कर्जाचे हप्ते भरले. मात्र नंतर त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले होते. कर्जाची रक्कम मिळताच रविंद्र व विजयने जिवाची मुंबई सुरु केली होती. ते दोघेही बारमध्ये जाऊ लागले. मौजमजेसाठी पैशांची उधळण करु लागले. दुकानातून होणारा प्रॉफिट तिला न देता त्यांनी बार आणि दारुमध्ये सर्व पैसे उडविले होते. कर्जाची रक्कम देणे बंद केल्याने तिला बँकेचे कर्जाचे हप्ते भरणे कठीण जात होते. त्यातून तिच्यावर कर्जाचा बोजा आणि मानसिक ताण वाढला होता. पतीसह त्याच्या मित्रानेच फसवणुक केल्याने ती प्रचंड मानसिक तणावात आली होती. त्याचा तिच्या कामावर परिणाम होऊ लागला होता.

एप्रिल २०२४ पासून या दोघांनी तिला कर्जाच्या हप्त्याची रक्कम दिली नसल्याने तिचा सिव्हिल स्कोर खराब झाला होता. दुसरीकडे बॅकेकडून कर्जाच्या हप्त्यासाठी विचारणा होऊ लागली होती. सतत पैशांची उधळण केल्यामुळे रविंद्र आणि विजयचे दुकान बंद झाले होते. दुकानाचे भाडे पुन्हा थकले होते. त्याच्याकडून आर्थिक मदत बंद झाल्याने तिच्या बँक खात्यातून दरमाह ७२ हजार कर्जाचे हप्ते जात होते. त्यातून तिची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. भाड्याच्या रुम राहत असल्याने घरभाड्यासह घर चालविणे कठीण झाले होते. त्यातच कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने तिला कायदेशीर नोटीस बजाविली होती.

सप्टेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत रविंद्र, विजय आणि श्रद्धा यांनी तिच्या कागदपत्रांवरुन तीन बँकेतून कर्ज घेऊन कर्जाचे हप्ते न भरता तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने तिच्या पतीसह इतर दोघांविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर रविंद्र बुरकुले, विजय बाणे, श्रद्धा बाणे यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०२४ रोजी काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत चार महिन्यानंतर तक्रारदार महिलेचा पती रविंद्र बुरकुल याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत श्रद्धा वाणे आणि विजय बाणे यांचा सहभाग उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page