चांगला परतावा देण्याच्या आमिषाने १.५८ कोटीची फसवणुक
बहिण-भावांना गंडा घालणार्या सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजू परुळेकर
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एकाच कुटुंबातील तीन व्यावसायिक बहिण-भावांची सातजणांच्या टोळीने १ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार मशिदबंदर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या सातजणांविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अविरुप विद्युत रॉय, महुआ रॉय ऊर्फ बॅनर्जी, भरत अशोककुमार बजाज, दिपांकर सिल, निकोलस मेल्लिअस, काजल आणि मौसीमी पाल अशी या सातजणांची नावे आहेत. या सर्वांची लवकरच पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
सर्फराज इब्राहिम मेमन हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मशिद बंदर परिसरात राहतात. अविरुप रॉयसह इतर आरोपी त्यांच्या परिचित असून त्यांची पे मार्क पेमेंट टेक्लॉजिस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. व्यवसाय वाढीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी सर्फराज मेमन यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीची विनंती केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यासह त्यांचा भाऊ अशफाक धरोडिया आणि बहिण पबनम दुधवाला यांनाही त्यांनी अशीच ऑफर दिली होती. त्यांचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांनी त्यांना गुंतवणुकीसह व्याजाचे आगाऊ पोस्ट डेटेड चेक देण्याचे मान्य केले होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवून १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत सर्फराज मेमन यांनी ६८ लाख रुपये, पबनम दूधवाला हिने २५ लाख रुपये तर अशफाक घरोडिया यांी ५० लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना सुमारे पंधरा लाख रुपयांचे व्याज देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या आरोपींनी त्यांना मूळ रक्कमेसह व्याजाचे १ कोटी ५८ लाख रुपयांचे पोस्ट डेटेड धनादेश दिले होते. दिलेल्या मुदतीत त्यांनी गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी ते त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी आरोपींनी दिलेले पोस्ट डेटेड चेक बँकेत टाकले होते. मात्र ते सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. गुंतवणुकीच्या नावाने या सातजणांनी तक्रारदार व्यावसायिकासह त्यांच्या भाऊ आणि बहिणीी फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात त्यांनी पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अविरुप रॉय, महुआ रॉय ऊर्फ बॅनर्जी, भरत बजाज, दिपांकर सिल, निकोलस मेल्लिअस, काजल आणि मौसीमी पाल या सातजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत सातही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.