भैय्या मत यार बोल असे बोलून २६ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग
जाब विचारणार्या मित्राला मारहाण करणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – चालताना धक्का लागला म्हणून भैय्या संभाळकर चलो असे म्हटले म्हणून भैय्या मत यार बोल असे बोलून एका २६ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करुन जाब विचारणार्या मित्राला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर रेल्वे स्थानकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद होताच कौशल कैलास गुप्ता या २७ वर्षांच्या आरोपी तरुणाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा देताना कौशलविरुद्ध विनयभंगासह मारामारीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
यातील २६ वर्षांची तक्रारार तरुणी ही बदलापूर येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. मंगळवारी ५ मार्चला ती तिच्या मित्राला भेटण्यासाठी बदलापूर येथून घाटकोपर रेल्वे स्थानकात आली होती. ब्रिजच्या दिशेने जाताना तिला कौशलचा धक्का लागला होता. त्यामुळे तिने सांभाळून चालण्याचा सल्ला दिला. तिने त्याला भैय्या म्हटले म्हणून त्याने तिला भैय्या मत बोलो, यार बोलो असे बोलून तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार ब्रिजवर तिची वाट पाहत असलेल्या मित्राला सांगितला. त्यामुळे त्याने कौशलला थांबवून त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यातून त्याने तिच्या मित्राला बेदम मारहाण केली. तसेच तक्रारदार तरुणीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला. हा प्रकार तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी कौशलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. घडलेला प्रकार या तरुणीने रेल्वे पोलिसांना सांगून कौशलविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी गंभीर दखल घेत आरोपी तरुणासविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कौशल गुप्ताविरुद्ध ३५४, ३२३ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी कुर्ला येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.