कामासाठी आणलेल्या कामगाराची हत्या करुन पुरावा नष्ट केला
कोर्टाच्या आदेशावरुन एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
राजू परुळेकर
८ जानेवारी २०२५
मुंबई, – मिठाई बनविण्याच्या कामासाठी कोलकाता येथून मुंबईत आणलेल्या जोगन बांगुर हंसडा या ३३ वर्षांच्या कामगाराने आत्महत्या केल्याचा बनाव करुन त्याची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोलकाता येथील लोकल कोर्टाच्या आदेशावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. मायाराणी सिंग, निमाय सिंग, बापी सिंग आणि लोचण सिंग अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतरच जोगनने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा उलघडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२५ वर्षांची पार्वती जोगन हंसडा ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत कोलकाता येथील मेदीनापूर, सालबोनीच्या डंगरपाड्यात राहत असून मृत जोगन हा तिचा पती आहे. ते सिंग कुटुंबियांच्या परिचित आहेत. त्यांचा मालाडच्या मालवणी परिसरात मिठाई बनविण्याचा व्यवसाय आहे. १० ऑक्टोंबरला या आरोपींनी तिचा पती जोगन याला मिठाई बनविण्याच्या कामासाठी मुंबईत आणले होते. मुंबई शहरात नोकरी मिळत असल्याने जोगन हादेखील आरोपीसोबत आला होता. १८ ऑक्टोंबरला तिचे तिच्या पतीसोबत शेवट बोलणे झाले होते. या संभाषणात सर्व काही ठिक असल्याचे तिला जाणवले होते. तिच्या पतीला कुठला मानसिक तणाव दिसून आला नव्हता. असे असताना दुसर्या म्हणजे १९ ऑक्टोंबरला सकाळी पाच वाजता मायाराणी हिने तिला कॉल करुन जोगन याने मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक पाच, विश्वशांती बुद्धविहार परिसरातील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सांगितली होती.
ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. मुंबईत येणे शक्य नसल्याने तिने मायाराणीला तिच्या पतीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कोलकाता येथे पाठविण्याची विनंती केली होती. मात्र तिच्यासह इतर तिघांनी त्याचा मृतदेह कोलकाता येथे न पाठविता मुंबईत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. ही माहिती काह दिवसांनी त्यांनी तिला सांगितली होती. हा प्रकार तिला संशयास्पद वाटला होता. मायाराणी, निमाल, बापी आणि लोचन यांनी कुठल्या तरी कारणावरुन तिचा पती लोचन यांची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा तिला संशय होता. त्यामुळे तिने संबंधित चारही आरोपीविरुद्ध सालबोनी पोलीस ठाण्यासह मेदीनापूरचे पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रा केली होती. या तक्रारीनंतर तिने तेथील लोकल कोर्टात एक याचिका सादर करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची विनंती केली होती.
या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने सालबोनी पोलिसांना हत्येचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी मायाराणी सिंग, निमाय सिंग, बापी सिंग आणि लोचण सिंग यांच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मालाड परिसरात घडल्याने या गुन्ह्यांचा तपास मालवणी पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे मालवणी पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. याच गुन्ह्यांतील चारही संशयितांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.