शेअरमध्ये दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा घालणार्या वॉण्टेड महिलेस अटक
मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे गुंतवणुक करणे महागात पडले
राजू परुळेकर
१४ मार्च २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींची सुमारे तेरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या डेल्फिना वितु कोळी या वॉण्टेड महिलेस मालवणी पोलिसांनी अटक केली तर तिचा पती अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिचा पती अजय महादेव चव्हाण याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुप्पट रक्कमेच्या आमिषाने तक्रारदाराने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली सर्व रक्कम शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि त्याची या जोडप्याने फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चंद्रदेव मुन्शी यादव हा शूटींग लाईनमध्ये कामाला असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत साकिनाका येथील अजीज कंपाऊंड, रामराज यादव चाळीत राहतो. त्याचा मोहम्मद शब्बीर हुसैन हा मित्र असून तो अंधेरीतील वर्सोवाचा रहिवाशी आहे. ते दोघेही एकाच ठिकाणी कामाला असून त्यानेच त्यांची ओळख अजय चव्हाणशी करुन दिली होती. त्याने अजयची पत्नी डेल्फिनाची जोसुवा ट्रेडर्स नावाची कंपनी असून ही कंपनीत शेअरमध्ये गुंतवणुक करते. त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास तीन महिन्यांत दुप्पट रक्कम ते दोघेही मिळवून देतील असे सांगितले होते. मुलीच्या लग्नासाठी चंद्रदेवला पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या आमिषाला बळी पडून अजयसह मोहम्मद शब्बीरने त्यांच्याकडे प्रत्येकी तीन लाख रुपये असे सहा लाख रुपये शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. तीन महिन्यानंतर या दोघांनी त्यांना दुप्पट रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतवणुक केल्यास पुन्हा ती रक्कम दुप्पट होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी अजयने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले आणखीन सात लाख रुपये तर मोहम्मद शब्बीरने आधी गुंतवणुक केलेली रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीस सांगितले.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना दुप्पट रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी त्यांना कॉल केले, मात्र त्यांचे मोबाईल बंद होते, त्यांच्या कार्यालयाला टाळे लावले होते. तसेच त्यांनी दुप्पट रक्कमेचे दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच या दोघांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अजय चव्हाण व त्याची पत्नी डेल्फिना कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अडीच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या डेल्फिना कोळीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अजय चव्हाणला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.