बोगस कोर्टाची वयोवृद्ध महिलेला अशीही आर्थिक शिक्षा
हिंदी चित्रपटाप्रमाणे शोभेल असा कोर्ट चालवून 4.82 कोटींना गंडा
अरुण सावरटकर
24 एपिल 2025
मुंबई, – अल्पवयीन मुलांच्या अपहरणासह महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यांसह 68 मिलियन फसवणुकीचा आरोप करुन सरकारी यंत्रणेच्या नावाखाली एका वयोवृद्ध महिलेवर ऑनलाईन कोर्टात खटला चालवून तिला संबंधित कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा ठोठावून आणि नंतर शिक्षेतून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी 4 कोटी 82 लाख रुपये विविध बॅक खात्यातून ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन सायबर ठगांना पोलिसांनी अटक केली आहे. बापी नानीगोपाळ दास आणि सुरीश सुशांता नाग अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत पोलीस असलेल्या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. फसवणुक करणारी ही नवीन टोळी सायबर जगतात सक्रिय झाली असून या टोळीने अशा प्रकारे इतर ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे ऑनलाईन खटला चालवून फसवणुक होण्याची ही मुंबईची पहिलीच घटना आहे.
सरकारी यंत्रणेच्या नावाखाली ठग नागरिकांची फसवणुक करण्याच्या घटनांचा आलेख पर्वतासारखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस नवनवीन युक्त्या करुन सायबर ठग सर्व सामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारतात. पण चक्क हिंदी चित्रपटाप्रमाणे बोगस कोर्ट उभारुन एका वयोवृद्ध महिलेला गंडा घातल्यात आला. तिच्याविरुद्ध सुरु असलेल्या खटल्यात तिला दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली. तिच्या भीतीच्या फायदा ठगाने तिला सहानुभूमी दाखवली आणि तिच्या बँक खात्यात 4 कोटी 82 लाख रुपये उकाळल्याची घटना माटुंगा परिसरात घडली होती. 71 वर्षांची वयोवृद्ध पारशी महिला ही गेल्या 50 वर्षांपासून माटुंगा येथील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे पती निवृत्त झाले असून त्यांचे दोन वेगवेगळ्या बँकेत दोन बचत खाते आहेत. 19 डिसेंबर 2024 रोजी तिला एका व्हॉटअप क्रमांकावर रिचार्ज करण्यासाठी कॉल आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच मोबाईलवरुन तिला पुन्हा एक व्हॉटअप कॉल आला होता. यावेळी समोरील व्यक्तीने कस्टमर केअर प्रतिनिधीला कॉल करण्यासाठी नऊ क्रमांक प्रेस करण्यास सांगितले. त्यामुळे तिने नऊ क्रमांक प्रेस केला असता समोरील व्यक्तीने तो ट्रायचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने तिची माहिती घेऊन तिचा मोबाईल क्रमांक रजिस्ट्रर असल्याचे सांगितले. तिचा मोबाईल क्रमांक बेकायदेशी कामासाठी वापरला जात असून तिच्या मोबाईलवरुन लहान मुलांचे अपहरण, महिलांचे छेडछाड आदी प्रकार घडल्याचे सांगितले.
इतकेच नव्हे तिच्या मोबाईलवरुन 68 मिलियनचा फ्रॉड झाला आहे. यावेळी तिने या संपूर्ण प्रकरणात तिचा काहीही संबंध नाही. तिचे वय 71 असून ती घरातून बाहेर जात नाही. त्यानंतर या व्यक्तीने तिचा कॉल कस्टम अधिकारी राजीव सिन्हा यांच्याकडे फॉरवर्ड केला होता. यावेळी राजीवने तिला तिच्याविरुद्ध केस सुरु असून त्याचा क्रमांक एमएच 5621/0224 असा असल्याचे सांगितले. त्याने तिच्याकडे तिच्या बँक खात्याविषयी विचारणा केली होती, मात्र तिने बँक खात्याची माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने कॉल बंद केला होता. दोन दिवसांनी तिला पुन्हा राजीव सिन्हा नाव सांगणार्या कस्टम अधिकार्याने कॉल केला होता. तिच्या केसचा तोच तपास अधिकारी असल्याचे सांगून त्याने तिची ऑनलाईन चौकशी सुरु केली होती. याच दरम्यान तिच्याशी संदीप राव नावाच्या अन्य एका व्यक्तीने संभाषण सुरु केले होते. तिच्या केसची व्हिडीओ कॉलवरुन सुनावणी होणार असून त्याने तिला सफेद कपडे परिधान करण्यास सांगितले. काही वेळानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी तिला समोर कोर्टात सुनावणी सुरु असल्याचे दिसून आले. कोर्टाच्या न्यायाधिशाने तिच्यावर आरोप करुन तिला शिक्षा सुनावली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. याच दरम्यान तिला संदीप राव आणि राहुल गुप्ता यांनी व्हॉटअप कॉल केला होता.
तिला शिक्षेतून सहीसलामत बाहेर काढण्याचे आश्वासन देत त्यांनी तिला ते सांगतील तसे करण्यास सांगितले. यावेळी या दोघांनी तिला काही बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती. या बँक खात्यात तिला पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते. 21 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तिने शिक्षेतून स्वतचा बचाव करण्यासाठी त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 4 कोटी 82 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर करुनही ते दोघेही तिला आणखीन पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगत होते. यावेळी तिने पैशांची व्यवस्था करत असल्याचे सांगितले. याच दरम्यान तिला टिव्हीवर सायबर फसवणुकीच्या काही जाहिरात दिसल्या होत्या. या जाहिराती पाहिल्यानंतर तिला तिची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईनसह मध्य प्रादेशिक सायबर सेल विभागात घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठगांविरुद्ध कट रचून फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने बापी दास आणि सुशरीश नाग या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल होते. चौकशीत या गुन्ह्यांत या दोघांचाही सहभाग उघडकीस आला आहे. या दोघांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर ही रक्कम त्यांनी एटीएमसह इतर बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यांच्यावर सायबर ठगांना विविध बँकेचे खाती पुरविल्याचा आरोप आहे. या दोघांचा इतर ऑनलाईन फसवणुकीचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे.